बारामती : न्यूज कट्टा
बारामती शहर आणि परिसरात विविध गुन्ह्यात सहभाग घेऊन स्वत:ची टोळी तयार करणाऱ्या दोघांवर बारामती शहर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. या दोनही आरोपींना पुणे जिल्हा, पुणे व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयासह फलटण तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विलास नाळे यांनी दिली.
धीरज रवींद्र पडकर आणि तुषार उर्फ चिंट्या मारुती सोनवणे (दोघेही रा. आमराई, बारामती) या दोघांवर बारामती शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, मारामारीसारख्या गुन्ह्यात या दोघांचा सहभाग आहे. तसेच धीरज पडकर याने स्वत:ची टोळी तयार करून त्याद्वारे विविध गुन्हे केले आहेत. तसेच परिसरातील बेरोजगार तरुणांना आकर्षित करून त्यांना या गुन्हेगारीत खेचलं जात आहे.
या टोळीकडून बारामती शहर आणि परिसरात दमदाटी करून दहशत निर्माण केली जात आहे. त्यांच्या कृत्यांना आळा बसावा यासाठी पोलिस निरीक्षक विलास नाळे यांनी धीरज पडकर आणि तुषार उर्फ चिंट्या सोनवणे या दोघांच्या हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
या दोघांनाही पुणे ग्रामीण, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयासह फलटण तालुक्याच्या हद्दीत न थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे दोघेही नमूद परिसरात आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक नाळे यांनी सांगितले. गुन्हेगारी स्वरूपाची कृत्ये करणारांची गय केली जाणार नसून त्यांच्यावरही अशाच स्वरूपाची कारवाई केली जाईल, असेही नाळे यांनी नमूद केले आहे.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, फौजदार सतीश राऊत, सागर जामदार, अक्षय सिताप, अमीर शेख, दत्तात्रय मदने, अमोल देवकाते, महेश बनकर, रामदास बाबर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.





