बारामती : न्यूज कट्टा
प्रेम प्रकरणातून मुलीसह तिच्या बहिणीकडून आणि वडिलांकडून होत असलेल्या ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळाला कंटाळून एका युवकानं गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरातील रुई परिसरात घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी संबंधित तरुणी, तिची बहीण आणि पोलिस अधिकारी असलेल्या वडीलावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर संबंधित युवकाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची आग्रही मागणी केली आहे.
विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (वय २३, रा. बयाजीनगर, रुई, बारामती) असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे. या प्रकरणी सृष्टी विकास मते,श्रुती विकास मते आणि पोलिस अधिकारी विकास मते या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल दि. १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यानं घरातील स्वयंपाक घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर त्याला रुई येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत प्रेम प्रकरणातून एका तरुणीसह तिच्या कुटुंबियांकडून मानसिक छळाबाबत उल्लेख केला आहे.
या प्रकरणी या युवकाच्या नातेवाईकांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गेल्या पाच वर्षांपासून विक्रमचे सृष्टी विकास मते हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. सुरुवातीला दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नंतरच्या काळात ही तरुणी आणि तिचे कुटुंबीय विक्रमला मानसिक त्रास देऊ लागले. दरम्यानच्या काळात, संबंधित युवती, तिची बहीण आणि वडिलांनी विक्रमाला पुण्यात बोलावले. त्याच्या मोबाईलमधील चॅट, फोटो डिलीट करण्यास भाग पाडलं.
आता तुझा काही संबंध राहिला नाही. पुढे काही केलं तर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी त्याला देण्यात आली. त्यानंतर या तरुणीच्या पोलिस अधिकारी असलेल्या वडिलांनी फोन करून विक्रमला धमकावले होते असंही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी सृष्टी मते, श्रुती मते, विकास मते (सर्व रा. खडकवासला, पुणे) यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०८, ३५१(२), ३५१(३), ३५२ व ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी मयत युवकाच्या कुटुंबीयांनी केली आहे.
तसेच या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्याचा समावेश असल्यामुळे त्यांना अटक करणार का, या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने केला जाणार का असेही सवाल कुटुंबीयांनी उपस्थित केले आहेत. आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी, मोबाईल डाटा, कॉल रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.





