बारामती : न्यूज कट्टा
बारामती वाहतूक शाखेने स्वच्छ, सुंदर आणि हरित असलेल्या बारामती शहरात आता ‘शांतता व सुव्यवस्था’ राखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कर्कश्श आणि मोठा फटाका आवाज असलेल्या बुलेट ताब्यात घेत त्यांचे सायलेन्सर काढून टाकण्याची मोहीम वाहतूक पोलिसांनी हाती घेतली आहे. मागील दोन दिवसात सुमारे १३ बुलेटचे सायलेन्सर जमा करून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून बारामती वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहतुकीला लगाम लावला आहे. विविध प्रकारच्याअ दंडात्मक कारवाया करत वाहनचालकांमध्ये जागृती करण्यात आली आहे. त्यानंतर आता कायद्याचे भान न ठेवता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या टुकारांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेने पावले उचलली आहेत. बारामती शहरातील वेगवेगळ्या भागात आणि महाविद्यालय परिसरात तरुणांकडे तसेच नागरीक मोठ्या प्रमाणात बुलेट दुचाकी वापरतात.
काही टुकार मात्र कंपनीने दिलेल्या दुचाकीत मनाप्रमाणे बदल करून या बुलेट ‘मॉडिफाय’ करण्यात रस घेत आहेत. त्यामध्ये कंपनीचे सायलेन्सर काढून त्या जागी फटाका सायलेन्सर बसवून ही वाहने शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोठा आवाज काढत फिरतात. याचा नाहक त्रास लहान मुले, वयोवृद्ध, मुली, रुग्णांना होतो. याबाबत वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी सूचना केल्या, दंडही केले. मात्र टुकार तरुणांना याचा कसलाही फरक पडत नसल्यामुळे आता पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे.
बारामती शहरातल्या चौका-चौकात नाकाबंदी करून अशा बुलेटचे सायलेन्सर काढून घेऊन किंवा ही वाहने थेट वाहतूक शाखेच्या दालनात नेऊन त्यांचे सायलेन्सर काढून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. विशेष म्हणजे जोपर्यंत काढलेल्या फटाका सायलेन्सरच्या जागी दुसरा विना आवाजाचा सायलेन्सर जोपर्यंत बसवला जात नाही तोपर्यंत अशी वाहने संबंधितांच्या ताब्यात दिली जात नाहीत. पोलिसांनी दोन दिवसांत तब्बल १३ बुलेटवर ही कारवाई केली आहे.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान सुधाकर जाधव, अजिंक्य कदम, सुभाष काळे, अशोक झगडे, रेश्मा काळे, प्रदीप काळे, स्वाती काजळे, योगेश कातवारे, जलद कृती दलाचे जवान अशोक मोरे, शिवाजी बरकडे, योगेश पळसे, अजय आहेर, हैदर जमादार, सुदर्शन कदम, सुभाष डोंबाळे, प्रिया पावडे, प्रियांका पोफळे, श्रद्धा थोरात यांनी ही कारवाई केली आहे.
नियमांचं उल्लंघन करणं पडेल महागात
‘वाहतूक शाखेकडून नागरिकांना वाहतूक नियमांबाबत वारंवार आवाहन केले जाते. प्रसंगी दंडात्मक कारवाई केली जाते, मात्र तरीही काही बेशिस्त टुकारांकडून नियमांची पायमल्ली केली जाते. परंतु आता नियम मोडणाऱ्यांविरोधात कडक मोहीम राबवली जाणार आहे. फटाका सायलेन्सर लावून कुणी फिरत असेल किंवा त्रास देत असेल तर +919923630652 या क्रमांकावर संपर्क करून संबंधित दुचाकीचा नंबर कळवण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.





