BARAMATI CRIME : अभ्यास करत नाही म्हणून जन्मदात्या पित्यानंच दाबला मुलाचा गळा; बारामती तालुक्यातील धक्कादायक घटना

बारामती : न्यूज कट्टा

अभ्यास करत नसल्याचा राग आल्यानं जन्मदात्या पित्यानं नऊ वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील होळ येथे घडली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी वडिलांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपीने आपल्या मुलाला भिंतीवर आपटत गळा आवळून त्याचा खून केल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.

पीयूष विजय भंडलकर असं खून झालेल्या दुर्दैवी मुलाचं नाव आहे. या प्रकरणी विजय गणेश भंडलकर, शालन गणेश भंडलकर, आणि संतोष सोमनाथ भंडलकर (सर्व रा. होळ, ता. बारामती, जि. पुणे) या तिघांवर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, १४ जानेवारी रोजी पीयूष हा आपल्या घरात असताना त्याचे वडील विजय भंडलकर याने त्याला अभ्यास न करण्यावरून जाब विचारला.

तू सतत घराबाहेरच असतो, अभ्यास करत नाही. तुझ्या आईप्रमाणेच माझी इज्जत घालवत आहेस असं म्हणत विजय भंडलकर याने रागाच्या भरात त्याला भिंतीवर आपटलं. एवढ्यावरच न थांबता त्याने पीयूषचा गळा दाबला. त्यानंतर पीयूषची हालचाल बंद झाल्याने विजय भंडलकर याने संतोष भंडलकर याच्या मदतीने त्याला नीरा येथील खासगी दवाखान्यात नेले. त्या ठिकाणीही पीयूषला चक्कर आल्याचं सांगण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पीयूषचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. त्यांनी मुलाला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याचा सल्ला दिला.

विशेष म्हणजे, यावेळी पीयूषची आजीही घटनास्थळी हजर होती. मात्र तिने मुलाला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट मुलाच्या सांगण्यावरून नातू पीयूष चक्कर आल्यामुळे पडल्याचं सांगितलं. त्यानंतर या तिघांनी पीयूषचा मृतदेह गावी आणला. त्याच्या मृत्युचं गूढ उकलू नये म्हणून थेट अंत्यविधीची तयारी केल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. दरम्यान, याबाबत माहिती मिळाल्यानंतर वडगाव निंबाळकर पोलिसांनी विजय भंडलकर, आई शालन भंडलकर आणि संतोष भंडलकर या तिघांवर खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करत आहेत.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!