बारामती : न्यूज कट्टा
बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील रोहित गाडेकर या युवकाच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना चाकण आणि वडगाव निंबाळकर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. शनिवारी रात्री रोहित गाडेकर याची धारदार शस्त्राने वार करत खून करण्यात आला होता. दरम्यान, व्याजाच्या पैशातून झालेल्या वादातून हा खून झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
सागर वसंत माने आणि विक्रम काकासो मिसाळ (दोघेही रा. सोरटेवाडी) अशी या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, शनिवारी रात्री रोहित सुरेश गाडेकर (वय २७, रा. मासाळवस्ती, सोरटेवाडी) याचा सागर माने आणि विक्रम मासाळ या दोघांसोबत वाद झाला होता. त्यातूनच या दोघांनी रोहितच्या छातीवर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार करत त्याचा खून केला होता.
आर्थिक देवाणघेवाणीतून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात होता. या घटनेनंतर हे दोघेही आरोपी फरार झाले होते. पोलिसांचे पथक या दोघांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले होते. या दरम्यान, चाकण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांना हे दोघेजण खेद तालुक्यातील बहुल येथील एका गोठ्यात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन आरोपींना ताब्यात घेतले.
या दोघांकडे अधिक चौकशी केल्यानंतर व्याजाच्या पैशांच्या वादातून हा खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. रोहित गाडेकर हा व्याजाच्या पैशांसाठी सातत्याने तगादा लावत होता. तसेच त्यातून तो मारहाण करत होता. त्यातूनच त्यांनी रोहितचा गेम वाजवण्याचा प्लॅन केला. शनिवारी रात्री या दोघांनी रोहितला एकटा गाठून त्याचा खून केला. या दोन्ही आरोपींना वडगाव निंबाळकर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.





