बारामती : न्यूज कट्टा
आपल्या जागेत बांधकाम केल्याचा जाब विचारणाऱ्या युवकाचा बाप-लेकानं बेदम मारहाण करत खून केल्याची घटना बारामती तालुक्यातील पारवडी येथील इंगळेवस्ती परिसरात घडली आहे. या घटनेनंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून किरकोळ संपत्तीच्या वादातून एका युवकाला जीव गमवावा लागल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.
सौरभ विष्णू इंगळे (वय २४) असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी प्रमोद रामचंद्र इंगळे आणि रामचंद्र जगन्नाथ इंगळे या दोघा बापलेकाला अटक केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सौरभ याने आपल्या जागेत बाथरुम का बांधले याचा जाब प्रमोद आणि रामचंद्र यांना विचारला. त्यावरुन त्यांच्यात शाब्दीक वाद झाला.
त्यानंतर या दोघा बापलेकांनी सौरभला बेदम मारहाण केली. यामध्ये सौरभ हा गंभीररित्या जखमी झाला. त्याला उपचारासाठी बारामती येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या दरम्यान, सौरभच्या विरोधात तक्रार देण्यासाठी प्रमोद आणि रामचंद्र हे दोघेही बापलेक बारामती तालुका पोलिस ठाण्यात गेले होते. त्याचवेळी सौरभच्या मृत्यूची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी लागलीच या बापलेकाला ताब्यात घेतलं.
दरम्यान, या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. भावकीतल्याच लोकांनी किरकोळ वादातून युवकाचा खून केल्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





