BARAMATI CRIME : आधी बहिणीची छेड काढली, नंतर जाब विचारला म्हणून भावावर कोयत्याने हल्ला; वर्षभर फरार सराईत आरोपीला ठोकल्या बेड्या

बारामती : न्यूज कट्टा

बारामती एमआयडीसीतील विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या परिसरात मुलीची छेडछाड केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावावर लोखंडी कडे व कोयत्याने प्राणघातक हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. एक वर्षांपासून हा आरोपी फरार होता. बारामती तालुका पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात दहशत माजवणाऱ्या आरोपींचे धाबे दणाणले आहे.

याबाबत माहिती अशी की, या संतापजनक घटनेत फिर्यादी आपल्या अल्पवयीन बहिणीची छेडछाड केल्याबाबत आरोपीला जाब विचारण्यासाठी विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय परिसरात गेला होता. त्यावेळी आरोपींनी त्याला हातातील लोखंडी कड्याने मारहाण करत लोखंडी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले होते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ११५(२), ७४, ७५, ७८ तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गौरव दिलीप टेंगले (रा. म्हसोबाचीवाडी, पणदरे, ता. बारामती) हा गेल्या एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दि. १९ डिसेंबर  रोजी एमआयडीसी परिसरातून या सराईत गुन्हेगाराला अटक करत त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यावर यापूर्वीही भिगवण, बारामती तालुका आणि बारामती शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत, कल्याण शिंगाडे, पोलीस अमलदार मनोज पवार, सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, दादा दराडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत करत असून न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!