सुपे : न्यूज कट्टा
गावोगावच्या मंदिरातील देवाच्या मूर्ती, मुखवटे यासह मंदिरातील साहित्याची चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात सुपे पोलिसांना यश आले आहे. चित्रपटाला शोभेल अशा पद्धतीने चोरट्यांचा पाठलाग करत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सोमवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या टोळीकडून जवळपास १०७ वर्षांपूर्वीची पानेश्वर देवाची मूर्तीसह अन्य मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ओंकार शशिकांत सांळुखे (रा. आनंदपुर ता. वाई, सध्या रा. शिरवळ, ता. खंडाळा जि. सातारा), तुषार अनिल पवार (रा. दत्तनगर, सांगवी रोड ता. खंडाळा जि.सातारा) आणि सौरभ दत्तात्रय पाटणे (रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात एका विधीसंघर्ष बालकाचाही समावेश असल्याचे आढळून आले आहे.
याबाबत माहिती अशी की, सुपे पोलिस ठाण्यातील सचिन दरेकर आणि अशोक वाघमोडे हे पोलिस कर्मचारी रात्रीची गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना दंडवाडी गावच्या हद्दीत एक मारुती अल्टो कार रस्त्याच्या कडेला नंबर प्लेटवर चिखल लावुन संशयीतरित्या थांबलेली दिसली. त्यामुळे हे दोघेही जवळ गेले असता संबंधित कारमधील इसमाने ही कार वेगात सुपे गावाच्या दिशेने नेली. त्याचवेळी येथील विठ्ठल मंदिराजवळ थांबलेले दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
ही बाब या पोलिस कर्मचाऱ्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांना दिली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यानच्या काळात सचिन दरेकर व अशोक वाघमोडे यांनी या कारचा सातारा जिल्ह्यातील लोणंदपर्यंत पाठलाग करत संबंधित इसमास ताब्यात घेतले. दुसरीकडे अंधारात पळून गेलेल्या दोघांनाही पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. या आरोपींकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी विविध मंदिरात चोरीची कबुली दिली. पोलिसांनी या टोळीकडून गेल्या १०७ वर्षापुर्वीच्या पानेश्वराची मुर्ती, दोन मुकुट, दोन समई, एक पंचार्थी, मूषक, १५ लहान मोठ्या घंटा असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या टोळीने सुपे, भोर, वेल्हा, सातारा, वाठार आणि हडपसर परिसरात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही पोलिसांकडून वर्तवली जात आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, कुलदिप संकपाळ, पोलिस उपनिरीक्षक जिनेश कोळी, सहा. फौजदार कारंडे, पो.हवा. रुपेश साळुंके, राहुल भाग्यवंत, संदिप लोंढे, विशाल गजरे, अनिल दनाणे, अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, विनोद पवार, सचिन दरेकर, सागर वाघमोडे,संतोष जाविर, तुषार जैनक, महादेव साळुंके, किसन ताडगे, रुषीकेश विर, होमगार्ड शिवतारे यांनी ही कामगिरी केली.





