बारामती : न्यूज कट्टा
बारामती नगरपरिषदेच्या कचरा संकलन करणाऱ्या वाहनाने माजी उपनगराध्यक्षांसह दोन महिलांना धडक दिल्याची घटना रविवारी सायंकाळी बारामती शहरातील गणेश भाजी मंडईमध्ये घडली. मद्यधुंद चालकाने रिव्हर्स घेताना हा अपघात झाला असून या प्रकरणी चालकासह तिघांवर बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सुनीता लोंढे यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश चव्हाण, शेखर पवार, विनायक शिंदे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवारी सायंकाळी बारामतीच्या माजी उपनगराध्यक्षा ज्योती नवनाथ बल्लाळ या बारामती शहरातील गणेश भाजी मंडईमध्ये संक्रांतीची खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी एनडीके या कंपनीच्या कचरा संकलन करणाऱ्या वाहनाने मागे उभ्या असलेल्या ज्योती बल्लाळ व त्यांच्यासोबत असलेल्या दोन महिलांना धडक दिली.
त्यामध्ये या तीनही महिलांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर या महिलांसह त्या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी संबंधित चालकाला दारू पिऊन गाडी का चालवतो असा जाब विचारला. त्यावर त्या चालकाने उलट उत्तर देत महिलांशीच अरेरावी केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी योगेश चव्हाण, शेखर पवार, विनायक शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मद्यधुंद चालकाकडे वाहनाचा ताबा कसा..?
दरम्यान, बारामतीत एनडीके कंपनीकडून स्वच्छतेचे कंत्राट घेण्यात आले आहे. या कंपनीने चालक मद्यधुंदावस्थेत असताना त्याच्याकडे वाहन कसं काय दिलं असा सवाल आता उपस्थित होत आहे. वास्तविक कचरा संकलन करणारी वाहने ही लोकवस्तीतून फिरवली जातात. त्यामुळं चालकही कर्तव्यदक्ष असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र मद्यधुंद चालकच वाहन चालवत होता ही बाब समोर आली असून आता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.





