बारामती : न्यूज कट्टा
बारामती शहर आणि परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या, तसेच विविध गंभीर गुन्हात सहभाग असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. बारामती शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची रवानगी नागपूर कारागृहात केली आहे. पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी या कारवाईबाबत प्रस्ताव पाठवला होता.
गणेश तुळशीराम पवार (वय ३३, रा. हंबीरबोळ, बारामती) असं या गुन्हेगाराचं नाव आहे. त्याच्यावर खूनाचा प्रयत्न, मारामारी असे गुन्हे दाखल असून तो बारामती शहर आणि परिसरात दहशत निर्माण करत होता. ही बाब लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी एमपीडीए कारवाई करण्याबाबत पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. पोलिस अधीक्षक गिल यांनी हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्याकडे पाठवला होता.
जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश पवार याला सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा ठरेल अशा कृत्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कायद्यातील तरतुदीनुसार एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले आहेत. बारामती शहर पोलिसांच्या पथकाने गणेश पवार याला ताब्यात घेऊन एक वर्षाच्या स्थानबद्धतेसाठी नागपूर कारागृहाकडे रवानगी केली आहे.
दरम्यान, बारामती शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या, अवैध व्यवसाय करणाऱ्या आणि गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवले जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी सांगितले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, पोलिस उपनिरीक्षक सतीश राऊत, रत्नदीप भंडारे, पोलिस अंमलदार महेश बनकर, सागर जमादार, अभिजीत कांबळे, सुलतान डांगे, रामचंद्र शिंदे, उदय टापरे, यशवंत पवार, अक्षय सिताप, अमोल देवकाते, विशाल चौधर, पोपट कवितके, वैभव मदने, विशाल शिंदे, गिरीश नेवसे, रईस मुलाणी, राहुल बडे यांनी ही कारवाई केली आहे.





