बारामती : न्यूज कट्टा
हॉटेलमध्ये कामासाठी आलेल्या परप्रांतीय महिलेला डांबून ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील पणदरे येथे घडला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि माळेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या महिलेची सुटका केली असून संबंधित आरोपीला अटक केली आहे.
पोपट धनसिंग खामगळ (वय २५, रा. खामगळवाडी, ता. बारामती) याच्यावर माळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती अशी की, पणदरे गावात एका परप्रांतीय महिलेला डांबून ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार संबंधित ठिकाणी पाहणी केली असता एक महिला पत्र्याच्या शेडमध्ये आढळून आली. कंपनीत काम करणाऱ्या एका मैत्रिणीमुळे पोपट खामगळ याची ओळख झाल्याची माहिती या महिलेने पोलिसांना दिली.
खामगळ याने पणदरे येथे आपल्या हॉटेलमध्ये काम लावतो असं सांगत या महिलेला आणलं होतं. शुक्रवार दि. ३ जानेवारी रोजी पीडित महिला पत्र्याच्या खोलीत झोपलेली असताना पोपट खामगळ याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. याबद्दल वाच्यता केल्यास तुला जीवे मारीन अशी धमकी तो देत होता. तसेच मी तुझ्या पाळतीवर लोक ठेवले आहेत, पळून जाण्याचा प्रयत्न केला तर तुझा फिक्स खून करेन असंही त्यानं धमकावलं होतं.
एवढ्यावरच न थांबता दोन दिवसांपूर्वी त्याने या महिलेला मारहाण करत लैंगिक अत्याचार केला. तसेच हॉटेलमध्ये कामासाठी आलेल्या जोडप्यातील एका महिलेला शारीरिक संबंध ठेवण्यास तयार करण्यास त्यानं पीडित महिलेला सांगितलं होतं. त्याची ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे आरोपीने या महिलेस पुन्हा मारहाण करत लैंगिक अत्याचार करून पत्र्याच्या खोलीत डांबून ठेवले.
त्यानंतर या महिलेने सोबत काम करणाऱ्या महिलेच्या फोनवरुन तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी पणदरे येथे जाऊन या महिलेची सुटका केली असून पोपट खामगळ याला अटक केली आहे. दरम्यान, पोपट खामगळ याच्यावर यापूर्वी बारामती शहर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा, तर माळेगाव पोलिस ठाण्यात महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अमोल खटावकर अधिक तपास करत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, माळेगावच्या पोलीस उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख, देवा साळवे, गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, माळेगावचे अंमलदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे, ज्ञानेश्वर मोरे, अर्चना बनसोडे, गोदावरी केंद्रे यांनी ही कारवाई केली आहे.





