बारामती : न्यूज कट्टा
घरगुती गॅस सिलेंडर मोठ्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरून हॉटेल व्यावसायिकांना विक्री करणाऱ्या रॅकेटचा सुपा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सुपा पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७० घरगुती सिलेंडरसह एक वाहन असा जवळपास ८ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तर एकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.
निखिल अनिल चांदगुडे (रा. खोपवाडी, ता. बारामती) असं या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुपा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना खोपवाडी हद्दीत सिलेंडरने भरलेले एक वाहन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह खोपवाडी येथील कालव्यालगत सापळा रचला.
त्या ठिकाणी एक मारुती कॅरी (क्र. एमएच ११ डीडी ६९९५) ही कार जाताना दिसली. पोलिसांनी या कारची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये एचपी गॅस कंपनीचे ७० गॅस सिलेंडर आढळून आले. याबाबत पोलिसांनी चालक निखिल चांदगुडे याच्याकडे चौकशी केली असता त्याने आम्ही घरगुती सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरून तो हॉटेल व्यावसायिकांना विक्री करत असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी निखिल चांदगुडे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २८७,२८८, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलिस उपनिरीक्षक जिनेश कोळी, पोलिस कर्मचारी किसन ताडगे, तुषार जैनक यांनी ही कारवाई केली.





