BARAMATI DEVELOPMENT : बारामतीतील विकासकामांवर अजितदादांचा ‘वॉच’; म्हणाले, विकासकामांच्या दर्जाबाबत ‘नो कॉम्प्रॉमाइज’

बारामती : न्यूज कट्टा  

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. नेहमीप्रमाणे भल्या पहाटेच त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. बारामती शहर आणि परिसरातील विविध विकासकामांना भेटी देत दिलेल्या मुदतीच्या आत दर्जेदारपणे विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्याचवेळी बारामतीत विविध विकासकामे होत असताना कामांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

बारामती शहरातील श्रीमंत बाबुजी नाईक वाडा सुशोभीकरण, दशक्रिया घाट परिसर, गोजुबावी येथील श्वान प्रशिक्षक केंद्र इमारत बांधकाम आदी विविध विकास कामांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, प्रांताधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.

श्रीमंत बाबुजी नाईक वाडा परिसराचा विकास प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधत आणि वाड्याचे मूळ रूप जतन करत करण्याचे निर्देश अजितदादांनी दिले. या ठिकाणी  भीमथडी ते बारामती असा बदलता प्रवास दाखविणारी छायाचित्रे लावावीत. परिसरात अधिकाधिक सावली देणाऱ्या विविध प्रजातीचे वृक्षारोपण करावे. नागरिकांना बसण्यासाठी वृक्षाभोवती दगडी ओटे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

कऱ्हा नदीच्या संरक्षक भिंतीची कामे गतीने करतानाच परिसरातील चेंबरवर स्थानिक पक्षाची छायाचित्रे लावून त्याची मराठी आणि इंग्रजी भाषेत माहिती द्यावी. तसेच परिसरात स्वच्छता राहील यादृष्टीने महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबवावी, अशीही सूचना त्यांनी दिली. ही सर्व कामे करताना नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतही त्यांनी सांगितले.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!