बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा
उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोणत्याही निवडणुकीत अतिशय बारकाईने नियोजन करत असतात. अनेकदा अजितदादा स्वतंत्रपणे व्यवस्था निर्माण करत विजयाची खात्री पक्की करताना दिसतात. त्याचाच प्रत्यय छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आला. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच अजितदादांचे ओएसडी सुनील मुसळे यांनी अजितदादांच्या फोटोसह ‘जय हो’ उल्लेख असलेलं स्टेटस टाकलं आणि सर्वांनाच कारखान्यातील विजयाचे संकेत मिळाले.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याची सध्याची अवस्था लक्षात घेता ही निवडणुकी बिनविरोध व्हावी अशी अजितदादांसह अनेक सभासदांची इच्छा होती. मात्र निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले नाही. या पार्श्वभूमीवर विद्यमान संचालक मंडळातील एकालाही उमेदवारी न देता अजितदादांनी सर्वांना धक्का दिला. सर्वच्या सर्व नवीन चेहरे देताना कारखान्याच्या हिताची जपणूक केली जाईल यावर अजितदादांनी भर दिला. त्याचवेळी निवडणुकीचं मायक्रो प्लॅनिंग करण्यासाठीही ते विसरले नाहीत.
नियमीत दौरे, प्रचार अशा जबाबदाऱ्या इंदापूरचे आमदार आणि क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, पृथ्वीराज जाचक, किरण गुजर यांच्यावर सोपवल्यानंतर कुठेही दगाफटका होऊ नये यासाठी अजितदादांनी स्वतंत्र यंत्रणा राबवली. अजितदादांनी आपले विशेष कार्य अधिकारी सुनीलकुमार मुसळे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. सुनीलकुमार मुसळे यांनी भवानीनगर येथील डॉ. राकेश मेहता यांना सोबत घेत सलग दहा दिवस छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात जाऊन थेट सभासद आणि अजितदादांचा संवाद घडवून आणला. याचीही परिणीती आजच्या निकालात पाहायला मिळाली.
ताकही फुंकून प्यायचं ही म्हण अजितदादांच्या मायक्रो प्लॅनिंगच्या बाबतीत तंतोतंत लागू होते याचंच हे उदाहरण म्हणता येईल. राज्याची जबाबदारी, नियमीत दौरे अशा गोष्टीत व्यस्त असतानाही निवडणुकीत कुठेही काहीच कमतरता राहू नये यासाठी अजितदादांनी राबवलेली यंत्रणा म्हणजे त्यांच्या राजकीय कौशल्याची चुणूक आहे. त्यामुळंच छत्रपती सहकारी साखर कारखान्यात मोठ्या फरकाने मिळालेला विजय अजितदादांच्या मायक्रो प्लॅनिंगचं उदाहरणच म्हणावं लागेल.





