बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा
बारामती नगरपरिषदेसह माळेगाव नगरपंचायत निवडणूकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्या आहेत. त्यानंतर झालेल्या मेळाव्यात अजितदादांनी निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी नगराध्यक्षपदासह नगरसेवक म्हणून उमेदवार कोण असेल याबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यामुळं आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक दिवस उरला असताना उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती काल बारामती येथील राष्ट्रवादी भवनात पार पडल्या. या मुलाखतीनंतर झालेल्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायत निवडणुकीबाबत आपली भूमिका मांडली. त्याचवेळी मागील काळात या दोन्ही परिसरात झालेल्या विकासकामांचाही त्यांनी आढावा घेतला. त्याचवेळी उमेदवारी कुणालाही मिळाली तरी गटातटाचे राजकारण न करता प्रामाणिकपणे पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
बारामतीचे नगराध्यक्षपद हे खुले असून तब्बल २१ जणांनी नगराध्यक्षपदासाठी पक्षाकडे मागणी नोंदवली आहे. त्यामध्ये अनेक मातब्बरांनी नगराध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावली आहे. नगरसेवकपदासाठीही अनेकांनी इच्छा प्रदर्शित करत अजितदादांकडे उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे अजितदादा कुणाला संधी देतात याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर माळेगावचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी आरक्षित असून अनेकजण इच्छुक आहेत.
एकूणच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता एकच दिवस उरला आहे. त्यामुळे अनेकांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ सुरू आहे. भाजप, शिवसेनेकडूनही या निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही मुलाखती झाल्यानंतर यादी जाहीर केली जाईल अशी शक्यता होती. मात्र आता उद्या उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता असून त्यात कुणाला संधी मिळते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.





