BARAMATI ELECTION BREAKING : छत्रपती साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात; सर्वच गटात जय भवानीमाता पॅनल आघाडीवर

बारामती : न्यूज कट्टा 

इंदापूर आणि बारामती तालुक्यात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी बारामती येथील प्रशासकीय भवनात पार पडत आहे. या निवडणुकीत सभासदांनी जय भवानीमाता पॅनलला पसंती दिल्याचं पाहायला मिळत असून सर्व गटांमध्ये या पॅनलचे उमेदवार मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत. दरम्यान, लासुर्णे गटातून पृथ्वीराज जाचक आणि शरद जामदार यांचा विजय झाला असून अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तब्बल १० वर्षांनी पार पडली आहे. कारखान्याची सध्याची अवस्था लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील पाच वर्षे कारखान्याची धुरा साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला. अजितदादांसह क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, पृथ्वीराज जाचक यांच्यानेतृत्वात  सर्वपक्षीय जय भवानीमाता पॅनलने ही निवडणूक लढवली.

तर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, तानाजी थोरात, मुरलीधर निंबाळकर यांच्या छत्रपती बचाव पॅनलने या निवडणुकीत सत्ताधारी गटाला आव्हान दिले होते. जय भवानी पॅनलकडून सर्वच्या सर्व म्हणजेच २१ जागांवर उमेदवार देण्यात आले. तर छत्रपती बचाव पॅनलला सर्व जागांवर उमेदवारही देता आले नाहीत. काल या कारखान्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज सकाळी बारामती येथील प्रशासकीय भवनात मतमोजणीला सुरुवात करण्यात आली.

प्रशासकीय भवनात तब्बल ३८ टेबलची रचना करण्यात आली असून दोन फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी ९ वाजता मतपत्रिका विभागणी करून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. मतदान मतपत्रिकेवर झाल्यामुळे मोजणीसाठी विलंब होत आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण कल हाती येऊन रात्री १० वाजेपर्यंत निकाल जाहीर होईल.

दरम्यान, सद्यस्थितीत जय भवानीमाता पॅनलचे सर्वच उमेदवार मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत. छत्रपती कारखान्याच्या सभासदांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यावरील विश्वास दाखवत पॅनल टू पॅनल मतदान केल्याचं समन्वयक तथा ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

पृथ्वीराज जाचक, शरद जामदार विजयी

दुसरीकडे, या मतमोजणीत लासुर्णे गटातून पृथ्वीराज साहेबराव जाचक आणि शरद शिवाजी जामदार यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. त्यांच्या विजयाची घोषणा अद्याप बाकी असली तरी त्यांनी मोठ्या मतांची आघाडी घेतली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!