बारामती : न्यूज कट्टा
बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांनी विविध प्रभागांमध्ये प्रचारासाठी हजेरी लावतानाच समाजातील विविध घटकांच्या भेटीगाठींवर भर दिला आहे. आज सकाळी त्यांनी रेल्वे स्टेशन मैदानावर क्रिकेटपटूंची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.. यावेळी उपस्थितांनी आग्रह केल्यानंतर त्यांनाही फलंदाजीचा आनंद घेण्याचा मोह आवरला नाही..
बारामती नगरपरिषदेची निवडणुक २ डिसेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सचिन सातव हे विविध प्रभागातील प्रचार पदयात्रांमध्ये सहभाग घेत मतदारांना राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन करत आहेत. त्याचवेळी त्यांनी समाजातील विविध घटकांच्या भेटीगाठींवर भर दिला आहे.
आज सकाळी त्यांनी रेल्वे स्टेशन मैदानावर क्रिकेटपटूंची भेट घेतली. बारामतीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून खेळाडूंसाठी विविध सुविधा उपलब्ध होत असल्याचे सांगून येणाऱ्या काळात बारामतीत भव्य स्वरुपातील क्रिकेट स्टेडीयमची उभारणी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. क्रिकेटसह अन्य खेळांसाठी पोषक वातावरण निर्मितीसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करु अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
यावेळी त्यांनी फलदांजीचाही आनंद घेतला. बारामतीकरांच्या आशिर्वादाने बारामती नगरपरिषदेतही अशाच पद्धतीने कामांची जोरदार बॅटींग करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बारामतीच्या विकासाची गती अधिक वाढवण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन सचिन सातव यांनी यावेळी केलं. दरम्यान, सचिन सातव यांनी क्रिकेटच्या मैदानात दाखवलेलं कौशल्य पाहून ऑल राऊंडर भूमिका असलेलं व्यक्तिमत्व बारामतीला लाभल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.





