बारामती : न्यूज कट्टा
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधूमाळीला सुरुवात झाली आहे. बारामती तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या बारा जागांसाठी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवार दि. २४ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कन्हेरी येथून केला जाणार आहे.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असून जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्र लढत आहेत. बारामतीतही राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या शनिवार दि. २४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.
कन्हेरी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे. या सभेत जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या कामांचा आढावा घेत भविष्यातील वाटचालीबाबत अजितदादा मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, नऊ वर्षांनंतर होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं अनेक इच्छुकांनी पक्षाकडे मागणी केली होती. मात्र अजितदादांनी अपवाद वगळता सर्वच नवीन चेहरे या निवडणुकीत उतरवले आहेत. त्यामुळं नाराजांची अजितदादा कशी समजूत काढतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.





