बारामती : न्यूज कट्टा
बारामती शहरातील तीन हत्ती चौकातील नटराज नाट्य कला मंदिरासमोर ३० मीटर उंचीचा आकर्षक आणि भव्य असा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. या ध्वजाचा लोकार्पण सोहळा स्वातंत्र्यदिनी दि. १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून आणि बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून हा राष्ट्रध्वज साकारण्यात आला आहे. बारामती शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या या राष्ट्रध्वजाचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दि. १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता पार पडणार आहे. खासदार सुनेत्रा पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. या निमित्तानं देशभक्तीपर गीतांसह नृत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि फायर शोही होणार आहे.
या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून भिगवण चौक ते तीन हत्ती चौकादरम्यान, नागरिकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला असून भिगवण चौकातूनच नागरिकांना कार्यक्रमस्थळी येता येणार आहे. वसंतनगर, मएसो हायस्कूल, वॉच टॉवर रोड, महावीर भवन रस्ता, नीरा कॅनॉल रस्ता या दिवशी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
स्वातंत्र्यदिनी होत असलेल्या या भव्यदिव्य सोहळ्याला बारामतीकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक कार्यक्रमाचं साक्षीदार व्हावं असं आवाहन किरण गुजर यांनी केले आहे.





