BARAMATI FOREX FRAUD : आईवडील शिक्षक, पोराचा वेगळाच तोरा; फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली अनेकांची केली लूट, बारामतीतील प्रकार

बारामती : न्यूज कट्टा

फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली सलग दोन वर्षे १५ टक्के परतावा आणि दोन वर्षांनी मुद्दलाची रक्कम देण्याच्या आमिषाने एकाने बारामती शहर आणि परिसरातील अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या महाभागाचे आई-वडील शिक्षक म्हणून बारामती तालुक्यात कार्यरत असून त्यांच्याकडून त्यांच्या मुलाची पाठराखण केली जात आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार देऊनही कारवाई होत नसल्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.

बारामती शहरातील एका व्यावसायिकाची या गुंतवणुकीच्या नावाने फसवणूक करणाऱ्या युवकाशी आणि शिक्षक असलेल्या त्याच्या आई-वडिलांशी ओळख झाली होती. त्यावेळी त्याने आपण शेयर मार्केटमध्ये काम करत असून फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला फायदा होईल असं सांगितलं.  दोन वर्षे १५ टक्के परतावा आणि दोन वर्षांनंतर मुद्दल परत देतो असं सांगून या व्यावसायिकाकडून जानेवारी ते डिसेंबर २०२३ या काळात वेगवेगळ्या तारखांना एकूण १० लाख रुपये गुंतवणुकीसाठी घेतले. सुरुवातीला काही दिवस या रकमेवर परतावाही दिला.

दरम्यानच्या काळात, त्याने तुम्हाला गरज असेल तेव्हा संपूर्ण लाभांशासह सर्व रक्कम मिळेल, अशी खात्री दिली. त्यानंतर संबंधित व्यावसायिकाने डिसेंबर २०२३ मध्ये आपल्याला पैशांची गरज असून रक्कम परत करण्याबाबत सांगितलं. लवकरच तुम्हाला तुमची रक्कम मिळेल असं सुरुवातीला या महाभागाकडून सांगण्यात आलं. त्यानंतर त्यानं आज-उद्या म्हणत ही रक्कम देण्यास चालढकल करायला सुरुवात केली. तो भेटल्यानंतर किंवा फोनवरही काम झाले की देतो असंच सांगत होता. त्यामुळं आज ना उद्या पैसे मिळतील या आशेवर हा व्यावसायिक होता.

या दरम्यान, बारामती तालुक्यात शिक्षक असलेल्या त्याच्या आईवडिलांनी मध्यस्थी केली. आता तुम्ही २५ लाख रुपये द्या, मग आम्ही तुम्हाला तुमचे पहिले १० लाख परताव्यासह परत देऊ आणि कालांतराने सगळी रक्कम देऊन व्यवहार संपवू अशी बतावणी केली. त्यावर या व्यावसायिकाने तुमच्यामुळे मी कर्जबाजारी झालो असून माझी आधीची रक्कम परत करा असा तगादा लावला. त्यावेळी शिक्षक असलेल्या वडीलांनी एक ते दीड महिन्यात रक्कम परत करतो असं सांगितलं. तसा मेसेजही या व्यावसायिकाला पाठवला. प्रत्यक्षात कित्येक महीने उलटूनही संबंधितांकडून ही रक्कम येत नसल्याची तक्रार या व्यावसायिकाने केली आहे.

शिक्षक आईवडिलांकडून तारीख पे तारीख  

या व्यावसायिकाने ऑगस्ट २०२५ मध्ये याबाबत बारामती शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र अद्याप यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे, या महाभागाने अनेकांना अशाच पद्धतीने गंडा घातला असून त्याचे शिक्षक असणारे आईवडील त्याच्या उद्योगांना ब्रेक लावण्याऐवजी त्याची पाठराखण करत आहेत. विशेष म्हणजे, अनेकांना गंडा घालणाऱ्या या युवकाला त्याच्या आईवडिलांनी आपल्या मूळ गावी पाठवत त्याचा बारामतीशी असणारा संपर्क बंद केला आहे. मुलाच्या उद्योगाला पाठीशी घालत त्यांच्याकडूनही गुंतवणूकदारांना तारीख पे तारीख दिली जात असून पोलीसही कारवाई करत नसल्यानं या कुटुंबांचं फावलं असून गुंतवणूकदार मात्र हतबल झाले आहेत.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!