बारामती : न्यूज कट्टा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मंगळवार दि. ८ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर ते सोलापूर येथे होणाऱ्या कार्यक्रमालाही हजेरी लावणार आहेत. बारामतीत सकाळी उद्योजक मेळावा आणि दुपारनंतर विविध विकासकामांचे भूमीपूजन आणि उदघाटन होणार आहे. तसेच सायंकाळी वकील आणि डॉक्टरांच्या मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं आहे.
आज सकाळी १० वाजता बारामती क्लब येथे अजितदादांच्या उपस्थितीत बारामती व परिसरातील उद्योजकांचा मेळावा पार पडणार आहे. त्यानंतर सोलापूर येथे होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमाला अजितदादा उपस्थित राहतील. सोलापूरहून परतल्यानंतर रेडबर्ड फ्लाईट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा फेलोशिप कार्यक्रम होईल.
दुपारी ४.३० वाजता माळेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा नामकरण समारंभ होणार आहे. ५.३० वाजता झारगडवाडी येथील बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन उपबाजाराचे भूमीपूजन होईल. त्यानंतर ६ वाजता जळोची येथे बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निर्यात सुविधा हाताळणी केंद्राचं उदघाटन अजितदादांच्या हस्ते होणार आहे. संध्याकाळी ७.३० वाजता सिटी इन हॉटेल येथे बारामती वकील संघटनेचा मेळावा होणार आहे. तसेच रात्री ९ वाजता भिकोबा तांबे सभागृहात बारामती डॉक्टर्स असोसिएशनचा मेळावा होणार आहे.





