BARAMATI NEWS : शेतात शेळ्या चरायला नेल्या अन् वीजेचा झटका बसला; कारखेलमध्ये तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

बारामती : न्यूज कट्टा

शेतात शेळ्या चरण्यासाठी नेल्या असता अचानक वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना बारामती तालुक्यातील कारखेल येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अल्केश जगनाथ लोंढे (वय ४०) असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. कारखेल गावातील लोंढेवस्ती येथील शेतात लोंढे हे शेळ्या चारत होते. त्याचवेळी रिमझिम पाऊसही सुरू होता. या दरम्यान, वीजेच्या खांबाजवळ असलेल्या तारांना स्पर्श झाल्यामुळे त्यांना जोरदार धक्का बसला. वीजेच्या धक्क्यामुळे लोंढे ही जागीच कोसळले. स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना तारांपासून दूर करत रुग्णालयात हलवले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, लोंढेवस्ती येथील शेतीपंपासाठी असलेल्या वीजवाहक तारा तीन महिन्यांपूर्वी अज्ञात ट्रकच्या धडकेत तुटल्या होत्या. त्यावेळी महावितरणकडून या तारांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. मात्र घटनेदिवशी याच परिसरातील तोडण्यात आलेली झाडे वीजपुरवठा सुरू असलेल्या खांबावर पडली. त्यामुळे वीजवाहक तारा जमिनीजवळ येऊन बंद असलेल्या तारांमध्ये वीजप्रवाह उतरल्यामुळे ही दुर्घटना घडली.

या घटनेनंतर लोंढे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून कारखेल परिसरात शोककळा पसरली आहे. लोंढे यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!