बारामती : न्यूज कट्टा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वत: अजितदादांनी याबाबत माहिती दिली असून बारामती शहरातील पाटस रस्त्यावरील वृंदावन लॉन्स येथे हा मेळावा आहे. या मेळाव्यात अजितदादा काय बोलतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा मेळावा महत्वपूर्ण असल्याचं मानलं जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. आज पहाटे त्यांनी नेहमीप्रमाणे बारामती शहर आणि तालुक्यातील विकासकामांना भेटी देत पाहणी केली. त्यानंतर शारदा प्रांगणात आयोजित कार्यक्रमात बोलताना उद्या सोमवारी दुपारी १२.३० वाजता वृंदावन लॉन्स येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केल्याची माहिती दिली. मला जे काही बोलायचं आहे ते या मेळाव्यात मी बोलेन असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.
या मेळाव्याला पक्षासह सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही अजितदादांनी केलं आहे. दरम्यान, आगामी विधानसभेच्या अनुषंगाने अजितदादांनी राज्यभर दौऱ्याचे नियोजन केले आहे. त्यातच आता बारामतीत उद्या होणाऱ्या मेळाव्यातून अजितदादा विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकतील अशी चर्चा होत आहे. एकूणच उद्या होत असलेल्या मेळाव्यात अजितदादा काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.





