BARAMATI POLITICS : बारामतीत पहिल्यांदाच राष्ट्रवादीकडून निरीक्षकांची नेमणूक; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अॅक्शन मोडवर..!

बारामती : न्यूज कट्टा      

राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून बारामती मतदारसंघ सर्वात चर्चेचा ठरण्याची शक्यता आहे. अशातच राष्ट्रवादी कॉँग्रेस अॅक्शन मोडवर असल्याचं पाहायला मिळत असून पहिल्यांदाच राष्ट्रवादीने बारामतीसाठी निरीक्षकांची नेमणूक केली आहे. एकीकडे अजितदादांनी पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले असताना आता निरीक्षकांची नेमणूक करत राजकीय डावपेच सुरू केले आहेत.

लोकसभा निवडणुकीत बारामतीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यानंतर अजितदादांनी बारामतीत कार्यकर्ता मेळावा घेत पराभवाची जबाबदारी आपली असल्याचं जाहीर केलं. त्याचवेळी त्यांनी बूथ स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं सांगत बारामती शहर आणि तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर बारामती शहर आणि तालुक्यातील बूथ कमिट्यांचे पुनर्गठण करण्याची जबाबदारी माजी नगरसेवक किरण गुजर यांच्यावर देण्यात आली आहे.

अशातच आता बारामती विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने सुरेश पालवे यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. निरीक्षक म्हणून नेमणूक होताच सुरेश पालवे यांनी बारामतीत येवून शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गावोगावी जाऊन सामान्य जनतेची मते जाणून घेतानाच पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यावरही आपला भर असेल असं सुरेश पालवे यांनी जाहीर केलं. येत्या विधानसभा निवडणुकीत अजितदादांचं मताधिक्य कसं वाढेल यावर विशेष लक्ष देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

एकूणच आधी सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, नंतर बूथ कमीट्यांचे पुनर्गठण आणि आता निरीक्षकांची नेमणूक करत अजितदादांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. येणाऱ्या काळात पक्षात नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूकही केली जाणार आहे. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष अॅक्शन मोडमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!