BARAMATI POLITICS : बारामतीत राष्ट्रवादीच्या इच्छुकांची धाकधूक वाढली; १५ ऑगस्टपर्यंत निवडी जाहीर करण्याच्या हालचाली, अजितदादाच घेतील अंतिम निर्णय..!

बारामती : न्यूज कट्टा

लोकसभा निवडणूक निकालानंतर बारामतीत पक्षांतर्गत बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अजितदादांच्या आदेशानंतर जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर अनेकांनी विविध पदांवर संधी मिळवण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय स्वत: अजितदादा घेणार आहेत. विशेष म्हणजे १५ ऑगस्ट रोजी अजितदादांकडून या पदांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता इच्छुकांची धाकधूक वाढली असून अजितदादा कुणावर विश्वास टाकतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर मागील काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात अजितदादांनी पक्षाच्या बूथ कमिटीपासून शहर आणि तालुका कार्यकारिणीत मोठ्या प्रमाणात बदल करण्याचे संकेत दिले. विशेष म्हणजे त्यांनी बारामती शहर आणि तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानंतर सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून आता नवीन निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांवरील नाराजीचा फटका बसला होता. त्यामुळे आता नव्याने निवडी करताना अनेक बाबींचा विचार केला जाईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक पातळीवर समन्वय साधून गटातटाचे राजकारण संपवण्यात यशस्वी ठरेल असे चेहरे महत्वाच्या पदांवर नियुक्त करणे आवश्यक आहेत. सामान्य जनतेशी संपर्क ठेवून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तत्पर असलेले आणि कार्यकर्त्यांनाही सन्मानाची वागणूक देणारे पदाधिकारी असतील तर त्याचे चांगले परिणाम होतील, असेही बोलले जात आहे.

इच्छुकांची फिल्डिंग

नव्याने होत असलेल्या निवडीत आपल्याला संधी मिळावी यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधत फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. अनेकांकडून विविध पदांसाठी मागणी करण्यात आली आहे. आपल्यालाच संधी मिळावी यासाठीही अनेकजण प्रयत्न करताना दिसत आहेत. कित्येक वर्षे जनतेतून गायब असलेलेही पक्षात पदांची मागणी करताना दिसत आहेत. त्यामुळे पक्षासाठीचं योगदान, जनसंपर्क, सामान्य लोकांसाठी उपलब्धता आणि कार्यक्षमता या गोष्टींचा विचार केल्याशिवाय पदे देऊ नयेत अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

पक्षातील रचना बदलणार..?

सध्या बारामतीत तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष ही दोन प्रमुख पदे बदलली जाण्याची शक्यता आहे. या निवडी १५ ऑगस्टपूर्वी जाहीर होतील अशी शक्यता आहे. या निवडी करतानाच बारामती विधानसभा अध्यक्ष म्हणूनही सक्षम व्यक्ती नेमण्याची गरज व्यक्त होत आहे. शहर आणि तालुक्यात तळगाळात संपर्क असणारा, सर्वांना सामावून घेत पक्ष संघटना मजबूत करणारा आणि पक्ष संघटनेतील कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेला चेहरा विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमल्यास त्याचा पक्षाला फायदा होईल, असेही मत व्यक्त होत आहे.

अजितदादांनी आजवर बारामतीत अनेकांना पक्षांसह विविध पदांवर काम करण्याची संधी दिली आहे. यातील मोजक्याच लोकांनी मिळालेल्या संधीचे सोने करत पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला. आता नव्याने बदल करताना योग्य व्यक्तींना संधी दिली तरच आगामी काळात पक्ष मजबूत होणार आहे. त्यामुळे लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षांमध्ये योग्य ठरतील अशा लोकांना संधी दिली जावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, स्वत: अजितदादा या पदांबाबत निर्णय घेऊन निवडी जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सध्या तरी विविध पदांसाठी इच्छुक असलेल्यांची धाकधूक वाढल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!