BARAMATI POLITICS : येत्या सोमवारी अजितदादा दाखल करणार उमेदवारी अर्ज; कन्हेरीतून होणार प्रचाराचा शुभारंभ

बारामती : न्यूज कट्टा

बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार हे निवडणूक लढवणार आहेत. सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी अजितदादा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी बारामती शहरातून मिरवणूक काढून शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. दुपारी २ वाजता कन्हेरी येथे प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे.

लोकसभा निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीतून निवडणूक लढवतील याबाबत साशंकता होती. त्यांनी जाहीर सभेतून आपण निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले होते. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर अजितदादांनी बारामतीतून निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार येत्या सोमवारी दि. २८ ऑक्टोबर रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सोमवारी सकाळी १० वाजता बारामती शहरातील कसबा येथील छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानापासून मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता निवडणूक कार्यालयात ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर कन्हेरी येथे प्रचाराचा शुभारंभ केला जाणार असून त्याच ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मतदार, पक्षातील कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पक्ष निरीक्षक सुरेश पालवे,तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे,निवडणूक प्रतिनिधी किरण गुजर यांनी केले आहे.

सलग आठव्यांदा निवडणूक रिंगणात   

उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून सलग आठव्यांदा निवडणूक लढवत आहेत. १९९१ साली बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या अजितदादांनी सलग सात निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रवादीतील फुटीनंतर ही त्यांची पहिली निवडणूक आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!