बारामती : न्यूज कट्टा
लोकसभेला काय झालं याचा आता विचार न करता विधानसभेला घड्याळासोबतच रहा असं आवाहन करतानाच विधानसभेला बारामतीकरांच्या मनातलाच उमेदवार असेल असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. त्यामुळे बारामतीतून अजितदादा निवडणूक लढणार की नाही याबाबतच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
बारामतीत काल विविध घटकांशी अजितदादांनी संवाद साधत पाच वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेत यापुढेही कामाची ही गती कायम राखण्यासाठी बारामतीकरांनी साथ द्यावी असं आवाहन केलं. लोकसभा निवडणुकीत तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे निर्णय घेतलात, अर्थात तो तुमचा अधिकार आहे. परंतु विधानसभेला मतदान करताना आजवर केलेल्या कामांचा विचार करावा असंही त्यांनी नमूद केलं. मागील निवडणुकीत तुम्ही राज्यात सर्वाधिक मताधिक्याने मला विजयी केलंत. त्यानंतर मीदेखील तुमच्या मतांची परतफेड करण्यासाठी सर्वाधिक निधी आपल्या बारामती तालुक्याला दिला आहे. विकासाची गती कायम राखण्यासाठी यापुढेही साथ द्या असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
बारामतीकरांच्या मनातला उमेदवार घड्याळ या चिन्हावर उभा असेल असं अजितदादांनी जाहीर करतातच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत घोषणाबाजी केली. गेली अनेक दिवस बारामतीतून अजितदादा उमेदवार नसतील अशा चर्चा सुरू होत्या. अशातच अजितदादांनी बारामतीकरांच्या मनातला उमेदवार असा उल्लेख करत आपल्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अजित पवार बारामतीतून लढणार नाहीत या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.





