बारामती : न्यूज कट्टा
लोकसभा निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे पदाधिकारी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्टपर्यंत या निवडी जाहीर होतील असे सांगण्यात येत होते. मात्र आजवर पदाधिकारी निवडी झालेल्या नाहीत. मात्र काहीही झाले तरी ठेकेदार पदाधिकारी न नेमता पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्यांनाच संधी द्यावी अशी अपेक्षा सामान्य कार्यकर्ते आणि नागरिक व्यक्त करत आहेत.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे हा फटका बसल्याचं बोललं गेलं. त्यानंतर अजितदादांनी कार्यकर्ता मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट करत बूथ कमिटीपासून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत काही बदल करावे लागतील असं जाहीर केलं. त्याचवेळी पक्षातील सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याच्या सूचना केल्या. अजितदादांनी पदाधिकारी बदलाचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे सर्वत्र स्वागत झाले आहे.
‘ठेकेदार’ पदाधिकारी नकोच..!
अजितदादांनी पदाधिकारी बदलाचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचं पाहायला मिळतं. लोकसभा निवडणूक काळात ‘ठेकेदार’ पदाधिकाऱ्यांवरून राष्ट्रवादीला हिणवलं गेलं. त्यामुळे आता पदाधिकारी निवडी करताना ठेकेदार नको तर पक्षाचं काम प्रामाणिकपणे करणारालाच संधी द्यायला हवी असे मत कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. अनेकजण इच्छुक असले तरी त्यांच्या बुथवर काय स्थिती होती याचाही विचार निवडी करताना व्हायला हवा अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
प्रामाणिक लोकांना संधी आवश्यक
एकूणच बारामतीचा विचार करता बारामती शहर आणि तालुक्यात पक्षासाठी वेळ देऊन काम करणारे चेहरे पदाधिकारी म्हणून निवडणे आवश्यक आहे. पक्षाचे काम प्रामाणिकपणे करतानाच स्वत:च्या हितापेक्षा पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्यांनाच संधी देण्याची गरज आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी पक्षाचे पद मिळवण्याचा खटाटोप करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला ठेवावे अशीही अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे.
गटातटाचे राजकारण संपवणारे पदाधिकारी निवडणे गरजेचे
वास्तविक गटातटाच्या राजकारणाचा मोठ्या प्रमाणात फटका राष्ट्रवादीला बसला आहे. त्यामुळे आता नव्याने निवडी करताना सर्वांना सामावून घेणाऱ्याचाच विचार होणे आवश्यक आहे. गावोगावी असलेले गट-तट संपवून सर्वांना एकत्र आणणारे पदाधिकारी असतील तर पक्षाची स्थिती बदलणे शक्य होणार आहे. त्यामुळे केवळ व्यक्तिगत संबंध जपण्यात धन्यता मानणारे या निवडीपासून दूरच ठेवावेत अशीही अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करतात.
अजितदादा हे राज्याच्या राजकारणात व्यग्र असतात. वास्तविक अजितदादा बारामतीत आल्यानंतर सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांसाठी वेळ देतच असतात. परंतु दादा आल्यानंतर पुढे पुढे करणाऱ्या पदाधिकाऱ्यांबद्दल एक प्रकारे नाराजी असल्याचंही पाहायला मिळालं. त्यामुळे बारामतीची जबाबदारी सक्षमपणे पेलू शकणाऱ्या, सामान्य जनतेशी नाळ जोडलेल्या पदाधिकाऱ्यांची अधिक गरज आहे.
एकूणच बारामतीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या विविध पदांसाठी अनेकांनी इच्छुक म्हणून निवेदने दिली आहेत. आपल्यालाच संधी मिळावी यासाठी अनेकजण देव पाण्यात ठेवून बसले आहेत. मात्र अजितदादा कोणाला संधी देतील हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. असे असले तरी सामान्य कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल अशाच आणि ठेकेदार नसलेल्या व्यक्तीलाच संधी द्यायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





