BARAMATI POLITICS : राष्ट्रवादीत महामंडळासाठी कार्यकर्त्यांकडून फिल्डींग, बारामतीतून किशोर मासाळ यांनी केली ‘ही’ मागणी

बारामती : न्यूज कट्टा   

विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामंडळावरील निवडी केल्या आहेत. अशात आता राष्ट्रवादीतील इच्छुक कार्यकर्त्यांनीही महामंडळासाठी फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे बारामतीतून राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी महामंडळाच्या निवडीत संधी देण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

राष्ट्रीय समाज पक्षात असलेल्या किशोर मासाळ यांनी २०१८ मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर मासाळ यांना राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन कर्जत-जामखेड मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून नेमण्यात आले होते. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारची सत्ता आल्यानंतर किशोर मासाळ यांनी अहिल्याबाई होळकर शेळी-मेंढी महामंडळावर नियुक्ती करण्याची मागणी केली होती. मात्र कोरोना काळात या नियुक्त्या रखडल्या.

कोरोना संपून काही दिवस जाताच महाविकास आघाडीची सत्ता गेली आणि शिंदे गट-भाजप युतीची सत्ता आली. वर्षभराच्या कालावधीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्त्यांबाबत पाऊल उचलल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील इच्छुकांच्याही आशा पल्लवीत झालेल्या आहेत.

बारामतीतून किशोर मासाळ यांनी आपल्याला शेळी-मेंढी महामंडळावर संधी द्यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. धनगर समाजाच्या विविध आंदोलनांबरोबरच समाजाच्या विविध उपक्रमांमध्ये किशोर मासाळ यांचा सक्रिय सहभाग असतो. चौंडी येथे लोकसभेच्या तत्कालीन सभापती सुमित्रा महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमावेळी धनगर आरक्षणासाठी किशोर मासाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. त्यावेळी त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाल्यामुळे काही महीने तुरुंगवासही भोगावा लागला होता.

दुसरीकडे पक्षाच्या कामातही किशोर मासाळ यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणात आपल्याला संधी मिळाली तर निश्चितच आपण त्याचं सोनं करू असंही किशोर मासाळ यांनी म्हटलं आहे. आजवर अजितदादा आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष यावर निष्ठा ठेवून काम केलं असून यापुढेही पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यावर आपला भर असणार आहे असेही किशोर मासाळ यांनी नमूद केले आहे. त्यामुळे आता मासाळ यांच्या मागणीबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!