बारामती : न्यूज कट्टा
जय पाटील यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी किरण किसनराव इंगळे यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इंगळे यांना निवडीचं पत्र देण्यात आलं. त्यानंतर त्यांनी आज प्रमुख पदाढीकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत पदभार स्वीकारला.
बारामती नगरपरिषद निवडणुकीनंतर जय पाटील यांनी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर या पदावर कुणाला संधी मिळणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. आता या पदावर किरण इंगळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी आज बारामती शहर राष्ट्रवादी कार्यालयात पदभार स्वीकारत आपल्या कामाला सुरुवात केली. यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल, महिला शहराध्यक्षा अनीता गायकवाड, माजी नगराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किरण इंगळे हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. त्याचवेळी त्यांचा विविध सामाजिक कार्यातही सहभाग असतो. बारामतीतील प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत आबा गणपती मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्कृष्ठ काम केलं आहे.त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने एका सर्वसमावेशक चेहऱ्याला अध्यक्षपदाची संधी दिली आहे. त्यामुळं पक्षातील कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
आज पदभार घेण्यापूर्वी किरण इंगळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार यांची भेट घेत आभार मानले. दरम्यान, अध्यक्षपदी दिलेल्या संधीबद्दल किरण इंगळे यांनी अजितदादा, खासदार सुनेत्रा पवार आणि पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत. शहरातील सर्व घटकांना सोबत घेऊन संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.





