बारामती : न्यूज कट्टा
आपली खासगी कार सोडली नाही म्हणून बारामतीतील एका आरटीओ अधिकाऱ्याने टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यावर दंडेलशाही केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर टोलनाका व्यवस्थापनाने सुपे पोलिस ठाण्यासह आरटीओ कार्यालयात तक्रार दिली आहे. त्यामुळे आता या मुजोर अधिकाऱ्यावर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
मागील तीन दिवसांपूर्वी बारामती येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील एक अधिकारी आपल्या खासगी कारमधून पाटसकडे जात होते. उंडवडी सुपे येथील टोलनाक्यावर संदीप लोंढे या कर्मचाऱ्याने या अधिकाऱ्याला ओळखपत्र मागितले होते. त्यावर संतप्त झालेल्या या अधिकाऱ्याने दोन दिवसानंतर आरटीओ कार्यालयाचे वाहन घेऊन येत येथील कर्मचाऱ्यांवर दंडेलशाही केली होती.
आपल्या वाहनात संबंधित ओळखपत्र मागणाऱ्या कर्मचाऱ्याला बसवून नेण्याचा या अधिकाऱ्याचा प्रयत्न होता. मात्र या टोलनाक्याचे व्यवस्थापक संतोष खापरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर या कर्मचाऱ्याला सोडण्यात आले. मात्र आपल्याला ओळखपत्र मागितले याचा राग धरून या अधिकाऱ्याने चक्क या कर्मचाऱ्याला कान धरून उठा-बशा काढण्यास भाग पाडले. त्यानंतर हा अधिकारी बारामतीच्या दिशेने रवाना झाला.
या घटनेनंतर टोलनाका व्यवस्थापनाकडून सुपे पोलिस ठाण्यासह बारामती आरटीओ कार्यालयात तक्रार देण्यात आली आहे. अधिकार क्षेत्र नसताना सार्वजनिक ठिकाणी जाऊन या अधिकाऱ्याने मुजोरी दाखवली. तसेच संबंधित कामगाराला उठाबशा काढायला लावल्या. वास्तविक अशा पद्धतीने वागणूक देण्याचा अधिकार या अधिकाऱ्याला नाही. असं असतानाही या अधिकाऱ्याने केलेल्या उद्दामपणाची सर्वत्र चर्चा होत आहे. त्यामुळे आता पोलिस आणि आरटीओ प्रशासन या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित होत आहे.





