BARAMATI TRAFFIC : बारामती शहरातील पूनावाला गार्डन परिसराचा श्वास झाला मोकळा; वाहतूक पोलिसांची नगरपरिषदेच्या सहकार्याने कारवाई, वाहतूक शिस्तीसाठी ‘नायलॉन दोरीचा’ प्रयोग..!

बारामती : न्यूज कट्टा

बारामती शहरातील गर्दीने गजबजलेल्या रस्त्यांचा श्वास मोकळा करण्यासाठी आणि बारामतीकरांना विनात्रास प्रवास करता यावा यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी एक संकल्पना राबवली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि गर्दीच्या ठिकाणांवर असलेली अतिक्रमणे मागे सारत वाहतूक नियंत्रणासाठी ‘नायलॉन दोरीचा’ प्रयोग राबवत बारामतीकरांनाच  नव्हे तर या ठिकाणी अनेक जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळवून दिला आहे.

बारामती शहरातील प्रसिद्ध असलेल्या पूनावालागार्डन परिसराच्या रस्त्यावर मोठी गर्दी असते. त्यामुळे असंख्य अस्ताव्यस्त वाहनांनी हा रस्ता अक्षरश: ठप्प होतो. यावर आजपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना झाली नसल्याने हा प्रश्न कायम भेडसावत होता. याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी देखील होत्या. या परिसरात मुला-मुलींची आणि महिलांची मोठी वर्दळ असते. त्यांना ये-जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती. गार्डनसमोरील अतिक्रमणे मागे सरकावत त्या ठिकाणी असलेल्या अस्ताव्यस्त वाहतुकीला नियंत्रणात आणले आहे.

शहरातील अनेक गर्दीच्या ठिकाणांवरील वाहतूक नियंत्रणात आणत आता पूनावाला गार्डन येथील वाहतुकीचा प्रश्न हाती घेत पोलीस निरीक्षक यादव यांनी ही कारवाई केली आहे. रविवारी पोलीस निरीक्षक यादव यांनी बारामती नगरपरिषदेच्या पथकाच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वीरीत्या राबवली आहे. यामध्ये सर्व दुकान धारकांना कारवाईबाबत माहिती दिली. त्यांना लोकांना होत असलेल्या अडचणींबाबत समजावून सांगत या रस्त्यावर असलेली अतिक्रमित सर्व दुकाने मागे घेतली.

वाहनचालकांनी आपली वाहने रस्त्यावर लावू नयेत यासाठी नगरपरिषद व वाहतुक पोलिसांच्या मदतीने वाहतुकीचे अंतर ठरवून नायलॉन दोरी ठोकण्यात आली आहे. ही दोरी म्हणजे वाहतुकीची ‘लक्ष्मण रेषाच’ ठरणार आहे. जी वाहने या दोरीला बाहेर जातील त्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सुरुवातीच्या आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत याबाबत नागरिकांची वाहतुक नियमांबाबत व दोरीच्या नियमाबाबत जनजागृती केली जाणार आहे. त्यानंतर जे नागरिक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर मात्र दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती सुदर्शन राठोड, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, वाहतूक अंमलदार अशोक झगडे, प्रशांत चव्हाण, सुधाकर जाधव, प्रदीप काळे, योगेश कांबळे, अजिंक्य कदम, स्वाती काजळे, सीमा साबळे, सविता धुमाळ, शीघ्र कृती दलाचे १४ जवान आणि  बारामती नगरपरिषद अतिक्रमण विभागाचे अनिल सरोदे, किरण साळवे, ज्योतू खरात, सागर गायकवाड, संदिप किरवे, सागर भोसले यांनी केली.

“बारामती शहरातील अनेक मुख्य ठिकाणी वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. पूनावाला गार्डनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना आणि मुली महिलांना ये-जा करण्यासाठी आता कोणतीही अडचण येणार नाही. नागरिकांनी पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. वाहतुकीच्या अनुषंगाने कसल्याही प्रकारची अडचण असल्यास ७७७७९२४६०३ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!