बारामती : न्यूज कट्टा
बारामतीचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळं बारामतीकरांनो, कृपा करून वाहतुकीचे नियम माझ्यासहित कुणीही मोडू नका, असं आवाहनच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने बारामती येथे पुणे ग्रामीण पोलीस दलातील प्राप्त नवीन वाहनांचे अनावरण तसेच बारामती उपविभागातील उघडकीस आलेल्या मालमत्तेच्या गुन्ह्यातील मालाचे मूळ मालकास वितरण अजितदादांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, प्रांताधीकारी वैभव नावडकर, पदाधिकारी सचिन सातव नाना होळकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, मोहन भटे, बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण, विलास नाळे, वैशाली पाटील, पोलीस अमलदार, इतर मान्यवर व पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.
गेली अनेक महिन्यांपासून बारामती वाहतुक शाखेने अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून बारामतीच्या वाहतूक कोंडीचा श्वास मोकळा केला आहे. वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण, पार्किंगसाठी नायलॉन दोरीचे प्रयोग, विना वाहन चालक परवाना, फॅन्सी नंबर, कार स्टंट आदींवर वेळोवेळी कारवाया करून आजपर्यंत लाखोंचा दंड वसुल केला आहे. एवढेच नव्हे तर बारामती शहरातील टवाळ व टुकार दुचाकी चालकांवरही वेळोवेळी कारवाया करून महिला-मुलींचा रस्ता सुरक्षित केला आहे.
नागरिकांना वाहतुकीचे नियम कळावेत यासाठी वाहतुक शाखेने सतत जनजागृती मोहीम राबवली आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी वाहतुक नियमांचे माहिती पत्रक काढले आहे. या जनजागृती मोहिमेच्या पत्रकाचे प्रकाशन ना. अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या वाहतूक पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाया करण्यात येत आहेत. त्यातच अशा बेशिस्त चालकांवर दंड आकारण्यात येत असून ही दंडाची रक्कमही वाढवण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकानं वाहतुकीच्या नियमांचं पालन केलंच पाहिजे अशा सूचनाही ना. पवार यांनी दिल्या.





