केडगाव : न्यूज कट्टा
तब्बल १०० वर्षांपेक्षा अधिक जुनी संस्था म्हणून परिचित असलेल्या दौंड तालुक्यातील केडगाव येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन ही संस्था सध्या चर्चेत आली आहे. या संस्थेत वास्तव्यास असलेल्या चार मुलींच्या विनयभंग प्रकरणात संस्थेतील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून नावाजलेल्या या संस्थेत नेमकं चाललंय काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
याबाबत माहिती अशी की, पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्था ही अत्यंत जुनी आणि नावाजलेली संस्था म्हणून परिचित आहे. मात्र गेल्या काही दिवसात या संस्थेतील कृत्यांबद्दल दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. अशातच दि. १७ एप्रिल २०२४ रोजी या संस्थेतील एलिम गार्डन येथे एक धक्कादायक प्रकार घडल्याचे उजेडात आले आहे. संस्थेतील कर्मचारी भास्कर निरुगट्टी याने तीन अल्पवयीन आणि एका सज्ञान मुलीसोबत विचित्र चाळे करीत त्यांचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत संबंधित मुलींनी संस्थेत काम करणाऱ्या महिलेला माहिती दिली. त्यानंतर या महिलेने हे प्रकरण संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यानच्या काळात हा प्रकार वरिष्ठांपर्यंत पोहोचल्याची कुणकुण लागताच भास्कर निरूगट्टी हा पसार झाला होता. याबाबत पोलिसांनी तपास सुरू करत आरोपी भास्कर निरूगट्टी याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाकडून चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी निरूगट्टी याच्यावर भादंवि कलम ३५४ (अ), बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम १०, १२, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम ३ (१), ३ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप हे करीत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून संस्थेत चालणाऱ्या प्रकारांबाबत चर्चा झडत आहेत. यापुढील काळात अशा प्रकारांवर आळा बसावा यासाठी ठोस उपाययोजना राबावण्याची मागणीही होत आहे.





