जुन्नर : न्यूज कट्टा
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाने शिवनेरी किल्ल्यावरून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली आहे. आज या यात्रेच्या पहिल्याच दिवशी शरद पवार गटातील नेते क्रेनमधून पडताना थोडक्यात बचावले आहेत. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
आज शरद पवार गटाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रेचा प्रारंभ करण्यात आला आहे. सकाळी शरद पवार गटातील नेत्यांनी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर येथील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, महिलाध्यक्षा रोहिणी खडसे आणि युवकध्यक्ष माहेबूब शेख यांनी क्रेनद्वारे जात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. त्यानंतर खाली येत असताना अचानकपणे क्रेनच्या ट्रॉलीमध्ये बिघाड झाला. त्यामुळे क्रेनच्या ट्रॉलीत असलेले जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे आणि महेबूब शेख हे पडता पडता थोडक्यात बचावले आहेत.
https://www.facebook.com/NewsKattaLive/videos/733149745549500
या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र काही काळ उपस्थित कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. क्रेनच्या ट्रॉलीतून हे सर्व नेते सुखरूप उतरल्यानंतर कार्यकर्त्यांना हायसे वाटले. एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य यात्रा सुरू करण्यात आली आहे. अशातच या यात्रेच्या पहिल्याच दिवशी अशी दुर्घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.





