पुणे : न्यूज कट्टा
शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेल्या वसंत मोरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मिडियावर पोस्ट करत त्यांनी याबाबत माहिती दिली असून त्याबाबत झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिपही शेअर केली आहे. मोरे यांचा भाचा प्रतीक कोडीतकर आणि मनसे कार्यकर्ता यांच्यातील हा संवाद असल्याचा दावा करण्यात असून यामध्ये संबंधित कार्यकर्त्याने एक तारखेपूर्वी वसंत मोरेंची विकेट टाकणार अशी भाषा वापरली आहे.
मनसेत असलेल्या वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता त्यांना मनसे कार्यकर्त्याकडून जीवे मारण्याची धमकी आल्याची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये वसंत मोरे म्हणतात, मी जर पुन्हा माझ्या जुन्या पक्षात गेलो तर असा काय गुन्हा केलाय की अगदी मनसे वाले माझी मर्डर करण्यापर्यंत गेले…? संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे मागणी केली आहे… पाहू पोलिस आता यावर काय भुमिका घेतात…
या पोस्टसोबत वसंत मोरे यांनी संभाषणाची क्लिपही शेअर केली आहे. यामध्ये संबंधित धमकी देणारा हा वसंत मोरे यांचा भाचा प्रतीक कोडीतकर याच्याशी बोलताना वसंत मोरे यांना जीवे मारण्याची धमकी देत आहे. मी यापूर्वीही अनेकदा तुरुंगात गेलो आहे. आता पुन्हा वसंत मोरे यांची विकेट टाकून तुरुंगात जाण्याची तयारी असल्याचंही या कार्यकर्त्यानं म्हटलं आहे.
दरम्यान, या धमकी प्रकरणानंतर वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा धमकी देणारा व्यक्ती मनसे कार्यकर्ता असल्याचे सांगत असून आता पोलिसांकडून याबाबत काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





