पुणे : न्यूज कट्टा
पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. काही भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून हवामान खात्याकडून उद्या शुक्रवार दि. २६ जुलै रोजीही अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नरच्या घाट माथ्यासह पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी याबाबत आदेश पारित केले आहेत.
पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळी वाढत असून नदी प्रवाहातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडला जात आहे. अशातच पुणे व पिंपरी चिंचवडमध्येही अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून तातडीच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत.
हवामान खात्याने आता उद्या शुक्रवारी दि. २६ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी उद्या शुक्रवारी या भागातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नरच्या घाट माथ्यासह पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
शाळा व महाविद्यालयांना सुट्टी असली तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार संबंधितांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजात सहभाग घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.





