मुंबई : न्यूज कट्टा
लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षानेही या अनुषंगाने कंबर कसली असून येत्या रविवारी दि. १४ जुलै रोजी बारामतीत जाहीर जनसन्मान मेळावा आयोजित केला जाणार आहे. यासाठी राज्यभरातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते हजेरी लावणार आहेत. हा मेळावा भविष्यातील वाटचालीबद्दल महत्वाचा संदेश देणारा ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
आज मुंबईत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, रामराजे नाईक निंबाळकर, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ, दिलीप वळसे पाटील, बाबा सिद्दीकी आदी मान्यवर, पक्षातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पक्षाच्या वतीने येत्या रविवारी दि. १४ जुलै रोजी बारामतीत जनसन्मान मेळावा आयोजित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
आज झालेल्या बैठकीत हा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला आहे. आजवर कधीच झाला नाही अशा ऐतिहासिक स्वरूपाचा हा मेळावा असेल. यामध्ये पक्षाच्या आगामी वाटचालीबाबतची दिशा जाहीर केली जाणार असून राज्यभरातील नेते या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, या मेळाव्याबाबत पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनीही ट्विट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक महत्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत, येत्या १४ जुलैला बारामतीत जाहीर “जन सन्मान” रॅली आयोजित करण्याचा ठराव पास करण्यात आला आहे. बारामतीची होणारी ही ऐतिहासिक रॅली पक्षाच्या कार्यकर्त्यांना, भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने महत्वाचा संदेश देणारी असेल. तसेच, काही दिवसांपूर्वी मी मांडलेल्या बजेटच्या योजनांचा लाभ आणि बळ जनतेला मिळवून देण्यासाठी पक्ष म्हणून कराव्या लागणाऱ्या कामांची देखील रूपरेखा या जाहीर सभेत सादर केली जाईल, असे त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केले आहे.





