पुणे : न्यूज कट्टा
आपल्या शाही थाट आणि अवास्तव अपेक्षांमुळे चर्चेत आलेल्या परिवीक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्याबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. पूजाने नगर जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याची माहिती उघड झाली आहे. २०१८ मध्ये दिव्यांग प्रमाणपत्र आणि २०२० मध्ये मानसिक आजाराबाबतचे प्रमाणपत्र दिल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे आता नगरच्या शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२०२३ मध्ये आयएएस अधिकारी झालेल्या पूजा खेडकर हिची पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात परिवीक्षाधीन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. शासकीय कार्यालयात खासगी ऑडी कार घेऊन येणे, कोणत्याही परवानगीशिवाय कारवर अंबर दिवा लावून महाराष्ट्र शासन असे नमूद करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षावर ताबा टाकणे आणि आपल्या अवास्तव मागण्यांसाठी अधिकाऱ्यांना वेठीस धरणे अशा कृत्यांमुळे पूजा खेडकर ही चर्चेत आली आहे.
पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर पूजा खेडकर हिची बदली वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. अशातच आता पूजाच्या दिव्यांग प्रमाणपत्राबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. अभिलेख तपासणीनुसार तिला नगरच्या शासकीय रुग्णालयातून २०१८ मध्ये दिव्यांग प्रमाणपत्र आणि २०२० साली मानसिक आजार असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याचे उघड झाले आहे.
२०२१ मध्ये तत्कालीन वैद्यकीय मंडळाकडून पूजाला डोळे आणि मानसिक आजाराबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तशा नोंदीही नगरच्या जिल्हा रुग्णालयात आढळून आल्या आहेत. या प्रमाणपत्रांच्या आधारेच पूजा आयएएस अधिकारी झाल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता नगर जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





