मुंबई : न्यूज कट्टा
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती व महाविकास आघाडीकडून आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. अशातच कॉँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी कॉँग्रेसचे चार आमदार फुटणार असून ते महायुतीच्या उमेदवारांना मतदान करतील, असा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच चर्चा रंगली असून आमदार गोरंट्याल यांनी थेट नावे घेतली नसली तरी ते आमदार कोण हे स्पष्ट केले आहे.
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगत असून एका उमेदवाराचा पराभव निश्चित आहे. अशात हा उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच राज्यातील चार मोठ्या पक्षांकडून आपल्या आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.
कॉँग्रेस आणि शरद पवार गटाचे आमदार क्रॉस वोटिंग करणार नाहीत अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता कॉँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी कॉँग्रेस आमदारांवरच संशय व्यक्त केला आहे. कॉँग्रेस पक्षाचे चार आमदार फुटणार असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. आमच्या उमेदवाराला कोणताही धोका नसला तरी आमच्या पक्षातले तीन ते चार आमदार या निवडणुकीत फुटणार आहेत असे आमदार गोरंट्याल यांनी म्हटले आहे.
जे आमदार फुटू शकतात त्यांची नावे आमदार गोरंट्याल यांनी घेतलेली नाहीत. मात्र त्यांच्याबद्दल बोलताना कुणाचा बाप राष्ट्रवादीत गेला, तर कुणाचा नवरा राष्ट्रवादीत आहे. एक टोपीवाला कधी इकडे तर कधी तिकडे असतो आणि एकजण नांदेडवाला असल्याचं गोरंट्याल यांनी सांगितलं आहे. तसेच फुटणाऱ्या आमदारांबाबत काय रणनीती करायची हेही आम्ही ठरवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.





