BIG BREAKING : माळेगाव साखर कारखान्यावर अजितदादांचं निर्विवाद वर्चस्व; विरोधकांना केवळ एकाच जागेवर यश

बारामती : न्यूज कट्टा  

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चुरशीच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एकवीस जागांपैकी वीस जागांवर यश मिळवत अजितदादांनी बारामतीत आपली मजबूत पकड असल्याचं दाखवून दिलं आहे. दुसरीकडे विरोधकांना या निवडणुकीत मतदारांनी स्वीकारले नसल्याचेही या निकालातून स्पष्ट झाले आहे. सांगवी गटातून सहकार बचाव पॅनलचे प्रमुख चंद्रराव तावरे हे एकमेव उमेदवार निवडून आले आहेत.

माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी २२ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर काल दि. २४ व आज दि. २५ जून अशा दोन दिवस सलग मतमोजणी करण्यात आली. सुरुवातीपासूनच अजितदादांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं. मात्र अन्य गटात आम्ही पुढे जाऊ असाच विश्वास विरोधक व्यक्त करत होते. एवढ्यावरच न थांबता या निवडणुकीत केवळ उपमुख्यमंत्री अजित पवार हे निवडून येतील असा दावा केला जात होता.

दरम्यान, काल आणि आज झालेल्या मतमोजणीमध्ये निळकंठेश्वर पॅनलच्या सर्वच उमेदवारांना सभासदांनी उत्स्फूर्त मतदान केल्याचं दिसून आलं. बारामती, सांगवी आणि महिला राखीव गटात चुरशीच्या लढती झाल्या. त्यामध्ये विरोधकांना केवळ सांगवी गटातून विजय मिळाला आहे. चंद्रराव तावरे यांचा बालेकिल्ला असलेल्या या गटातील लढत लक्षवेधी ठरली असली, तरी येथून निळकंठेश्वर पॅनलचे दोन उमेदवार निवडून आले आहेत.

ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे हे एकमेव विरोधी उमेदवार अत्यल्प फरकाने निवडून आले आहेत. तसेच महिला गटातही निळकंठेश्वर पॅनलच्या ज्योती मुलमुले या कमी फरकाने विजयी झाल्या. अन्य उमेदवारांनी मात्र चांगले मताधिक्य घेतल्याचे आजच्या निकालात स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी निळकंठेश्वर पॅनलच्या जागा वाढल्या असून मताधिक्यातही वाढ झाली आहे.

निळकंठेश्वर पॅनलचे विजयी उमेदवार : ब वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून रतनकुमार भोसले, इतर मागास प्रवर्गातून नितीन शेंडे, भटक्या विमुक्त जाती-जमाती प्रवर्गातून विलास देवकाते, महिला राखीवमधून संगीता कोकरे, ज्योती मुलमुले, माळेगाव गटातून बाळासाहेब तावरे, शिवराज जाधवराव, राजेंद्र बुरुंगले, पणदरे गटातून योगेश जगताप, तानाजी कोकरे, स्वप्नील जगताप, सांगवी गटातून गणपतराव खलाटे, विजय तावरे, खांडज-शिरवली गटातून प्रताप आटोळे, सतीश फाळके, निरावागज गटातून जयपाल देवकाते, अविनाश देवकाते आणि बारामती गटातून नितीन सातव, देवीदास गावडे

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!