पुणे : न्यूज कट्टा
पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ताम्हिणी घाटात तळ ठोकून बसलेल्या तेरा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
रविवारी दि. १ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या १४ ते १५ हल्लेखोरांनी गोळीबार केला. तसेच त्यांच्यावर कोयत्याने वारही करण्यात आले. या घटनेत वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर वनराज आंदेकर यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. या हत्येच्या घटनेवेळी वनराज यांची बहीण आणि मेहुणे हा संपूर्ण प्रकार पाहत होते. विशेष म्हणजे हल्लेखोरांना त्यांच्याकडून चिथावणी देण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. या हत्येप्रकरणी यापूर्वी वनराज यांच्या बहीण आणि मेहुण्यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथके रवाना करण्यात आली होती.
आज सायंकाळी पोलिसांच्या पथकाला हे सर्व हल्लेखोर ताम्हिणी घाटात तळ ठोकून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे. या हत्येनंतर फरार झालेल्या १३ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आल्यामुळे या हत्येमागील गूढ उकलण्याची शक्यता आहे.





