बारामती : न्यूज कट्टा
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचं बिगुल वाजलं असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासही सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीत मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. कालच्या महानगरपालिका निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची गोविंद बाग या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढण्याबाबत चर्चा झाली आहे.
कृषिक प्रदर्शनाच्या उदघाटनानिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार बारामतीत आहेत. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांची भेट घेत प्रदीर्घ चर्चा केली. या भेटी दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार हेही उपस्थित होते. जिल्हा परिषद निवडणुका दोन्ही राष्ट्रवादीकडून एकत्र लढवण्याची चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती पुढे येत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही या बैठकीबाबत माहिती दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत एकत्र येण्याबाबत चर्चा झाली आहे. त्यानुसार स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील मतदार यामध्ये फरक असून मतांचे विभाजन टाळण्यासाठी आम्ही एकत्र येण्याबाबत निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, काल महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे लगेच कामाला लागले आहेत. त्याच अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी अजित पवार यांनी गोविंद बाग येथे जाऊन शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे.





