नीरा : न्यूज कट्टा
भरदिवसा घरावर दरोडा टाकून पळ काढणाऱ्या तीन चोरट्यांचा ग्रामस्थ आणि पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत करेक्ट कार्यक्रम केला आहे. पुरंदर तालुक्यातील दौंडज गावात ही थरारक घटना घडली आहे. दरोडा टाकून उसात लपलेल्या चोरट्यांचा स्थानिक ग्रामस्थ व तरुणांच्या मदतीने ड्रोनद्वारे शोध घेत त्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील दौंडज येथील एका घरावर चार ते पाच चोरट्यांनी दरोडा टाकला. ही बाब समजल्यानंतर स्थानिक तरुणांनी तात्काळ त्यांचा पाठलाग सुरू केला. नीरा गावाजवळ असलेल्या थोपटेवाडी येथील रेल्वे गेट बंद असल्यामुळे या चोरट्यांची गाडी अडकली आणि त्यांना गाठण्यात ग्रामस्थांना यश आलं. या दरम्यान, दोघांनी पिस्तुलाचा धाक दाखवत पोबारा केला. मात्र वाहन चालक ग्रामस्थांच्या तावडीत सापडला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जेजूरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अधिक माहिती घेतली असता जेऊर येथील एका उसाच्या शेतात पळून गेलेले चोरटे लपल्याचे समोर आले. संपूर्ण ऊस असल्यामुळे या चोरट्यांचा शोध घेणे अवघड होते. या दरम्यान, जवळपास दीडशे ते दोनशे स्थानिक तरुणांनी या शेतीला वेढा घातला. त्यानंतर ड्रोन उडवून शेताचं सर्वेक्षण करत चोरट्यांचा ठावठिकाणा शोधण्यात आला.
चोरट्यांचा शोध लागताच ग्रामस्थ आणि पोलिसांनी उसात जाऊन दोघांना ताब्यात घेतलं. लखनसिंग रतपुतसिंग धुधानी (वय ३५), बेहतसिंग शामसिंग कल्याणी (वय ३०) आणि रत्नेश राजकुमार पुरी (वय २३) अशी या चोरट्यांची नावे असून ते तिघेही संभाजीनगर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या दोघांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
या कारवाईमध्ये रविराज कोकरे, संदीप भापकर, विठ्ठल कदम, घनश्याम चव्हाण, संतोष मदने, केशव जगताप, दशरथ बनसोडे, प्रसाद कोळेकर या पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. एखाद्या चित्रपटाला शोभावा अशा या प्रसंगाने ग्रामस्थही चांगलेच भयभीत झाले होते. स्थानिक तरुणांनी आणि ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या चोरट्यांना वेळीच जेरबंद करण्यात यश आलं.





