मुंबई : न्यूज कट्टा
बारामती नगरपरिषदेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. नगरपरिषदेची निवडणूक पुन्हा घ्यावी या मागणीसाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत उद्या दि. ५ डिसेंबर रोजी सुनावणी होणार असून याचा निर्णय काय होतो याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामती नगरपरिषदेची निवडणूक २ डिसेंबर रोजी होणार होती. मात्र काही उमेदवारांनी अर्ज दाखल करून घेतला नसल्याचे सांगत न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळं न्यायालयानं त्यांना अर्ज भरण्याची मुभा दिली. त्यानंतर अपिलाची मुदत असल्याचं कारण देत बारामती नगरपरिषदेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जैसे थे ठेवून २० डिसेंबर रोजी मतदान घेण्याचे निर्देश देण्यात आली. त्यानुसार आक्षेप असलेल्या प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानंतर चिन्ह वाटप आणि अन्य प्रक्रिया पूर्ण करून मतदान होणार आहे.
दरम्यान, बारामतीतील एका महिला उमेदवाराने आता उच्च न्यायालयात धाव घेत निवडणूक प्रक्रिया नव्याने घेण्यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी सुनावणी होणार आहे. त्यामुळं सध्या तरी बारामती नगरपरिषदेची निवडणूक २० डिसेंबरलाच होते की अन्य काही निर्णय होतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.




