बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा
डेअरी व्यवसायातील कंपनीची १० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बारामतीच्या लखोबा लोखंडेवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन कोटी रुपयांचं लोणी खरेदी करून त्याची रक्कम अदा न करता दूध आणि दूध पावडर पुरवठ्यासाठी रक्कम उकळल्याप्रकरणी मुंबईतील अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बारामतीतील लखोबा लोखंडेच्या कारनाम्यांबाबत ‘न्यूज कट्टा लाईव्ह’ सर्वप्रथम वृत्त प्रकाशित करत या प्रकरणांचा पाठपुरावा केला होता.
आनंद सतीश लोखंडे (रा. जळोची, बारामती) असं या लखोबा लोखंडेचं नाव आहे. या प्रकरणी बारामती डेअरी प्रा. लि. कंपनीचे गुरुप्रीत सिंग यांनी फिर्याद दिली आहे. या लखोबाने विद्यानंद डेअरी लि. या कंपनीच्या नावावर बारामती डेअरी प्रा. लि. या कंपनीकडून एका आठवड्यात रक्कम देण्याचं आश्वासन देऊन तब्बल २ कोटी रुपयांचं लोणी खरेदी केलं. दरम्यानच्या काळात या कंपनीकडून दूध पुरवठ्यासाठी म्हणून तब्बल ९३ लाख रुपये घेतले. तसेच या कंपनीकडून दूध व्यावसायिकांना अतिरिक्त फायदा देण्यासाठी म्हणून ६ कोटी ४३ लाख रुपयांची बनावट बिले सादर केली. प्रत्यक्षात ही रक्कम कंपनीला मिळालीच नाही.
याच काळात या लखोबाने तुम्हाला दूध पावडर पुरवतो असं सांगून या कंपनीशी संबंधित अन्य कंपनीकडून ३२ लाख रुपये उकळले. त्यानंतर संबंधित कंपनीने माल नेण्यासाठी इंदापूर तालुक्यातील एका प्रकल्पावर वाहन पाठवले. मात्र चार दिवस वाहन थांबूनही कोणताही माल मिळाला नाही. त्यानंतर कंपनीच्या संचालकांना हा फसवणुकीचा प्रकार असल्याचं लक्षात आलं. याबाबत संबंधित लखोबाकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यानं संबंधितांना रक्कम अदा केली नाही. या दरम्यान, या लखोबाने संबंधितांना धनादेश दिले. मात्र ते वटलेच नाहीत. त्यामुळे संबंधित लखोबा केवळ फसवणूक करत असल्याचं लक्षात आल्यानंतर या कंपनीने पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी मुंबईतील अंबोली पोलिस ठाण्यात आनंद सतीश लोखंडे याच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या लखोबाने अनेकांची फसवणूक केल्याची प्रकरणे समोर येत आहेत. महाराष्ट्रातील अधिकारी, उद्योजकांसह परराज्यातील उद्योजकांनाही या लखोबाने टोप्या घातल्या आहेत. बारामतीजवळील मतदारसंघातील नेत्यांची जवळीक सांगत अनेकांना गंडा घालणाऱ्या या लखोबाबाबत अनेक ठिकाणी तक्रारी दाखल असून त्याच्या प्रतापानंतर पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता पोलिस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.





