बारामती : न्यूज कट्टा
बारामती नगरपरिषदेच्या अग्निशमन अधिकाऱ्याने चक्क मुख्याधिकाऱ्यांच्याच सह्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील अकॅडमींना अग्निशमन अधिकाऱ्याने बेकायदेशीरपणे मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने सह्या करून फायर एनओसी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी कोणालाही सह्यांचे अधिकार दिलेले नसल्याचे लेखी कळवले असून आता या अधिकाऱ्यावर बेकायदेशीरपणे सह्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार का असा सवाल तक्रारदार मोहसीन पठाण यांनी उपस्थित केला आहे.
बारामतीत मोठ्या प्रमाणात बोगस अकॅडमी चालवल्या जात आहेत. या अकॅडमींकडून मनाला वाटेल त्या पद्धतीने शुल्क आकारून पालकांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. विशेष म्हणजे या अकॅडमींना शासनाकडून परवानगी नसताना त्यांच्याकडून खुलेआमपणे पालकांची लूट सुरू आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी बेकायदेशीर अकॅडमींविरोधात मोहीम उघडली असून त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत.
या आंदोलनादरम्यान, प्रशासनाकडून फायर एनओसी नसलेल्या अकॅडमी सील करण्याचा निर्णय घेतला होता. या अनुषंगाने बारामती नगरपरिषदेतील सहाय्यक अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक पद्मनाभ कुल्लरवार यांनी ६ जून २०२३ ते २३ जून २०२३ या काळात शहरातील ३१ अकॅडमींना फायर एनओसी घेण्याबाबत नोटिसा दिल्या. विशेष म्हणजे मुख्याधिकाऱ्यांनी कोणतेही अधिकार दिलेले नसताना पद्मनाभ कुल्लरवार यांनी स्वत:च मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने सह्या करून या नोटीसा बजावल्या.
वास्तविक नगरपरिषद अधिनियमातील तरतुदीनुसार मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने सह्या करण्याचा अधिकार कोणालाही नाही. मुख्याधिकाऱ्यांनी ठराविक परिस्थितीत हा अधिकार दिल्यास संबंधित अधिकाऱ्याने स्वत:चे नाव आणि पद लिहून मुख्याधिकारी यांच्याकरिता सही करावी असा नियम आहे. मात्र सहाय्यक अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक पद्मनाभ कुल्लरवार यांनी आपणच बारामती नगरपरिषदेचे मालक अशा आविर्भावात थेट सह्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
मुख्याधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय सह्या केल्यामुळे या नोटीसा आपोआपच बेकायदेशीर ठरत असून त्या अनुषंगाने दिलेल्या फायर एनओसीही बेकायदेशीरच ठरत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी सांगितले. बारामती नगरपरिषदेतील अग्निशमन विभागाचे पद्मनाभ कुल्लरवार यांना अधिकार नसताना त्यांनी मुख्याधिकाऱ्यांची सही करणं हे नियमाचं उल्लंघन असून त्यांच्यावर बेकायदेशीरपणे सह्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणे आवश्यक असल्याचेही मोहसीन पठाण यांनी सांगितले.
मुख्याधिकाऱ्यांचेच पाठबळ..?
अग्निशमन विभागातील अधिकारी पद्मनाभ कुल्लरवार यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेकांच्या तक्रारी आहेत. तसेच अकॅडमी प्रकरणात त्यांनी आर्थिक संगनमताने बेकायदेशीरपणे फायर एनओसी दिल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या वरिष्ठ पातळीवरून सूचना आहेत. तसे आदेशही पारित झाले आहेत. मात्र अद्यापपर्यंत या अधिकाऱ्यावर कारवाई केली जात नाही. मुख्याधिकाऱ्यांकडून या अधिकाऱ्याला पाठीशी घातले जात आहे का अशीही शंका या निमित्तानं उपस्थित होत आहे.





