बारामती : न्यूज कट्टा
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवतीला लग्नाचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या बारामती येथील रियल डेअरीचे प्रमुख मनोज तुपे यांच्यावर आता आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. वाढीव दर देण्याच्या आमिषाने सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील एका शेतकऱ्याची ५१ लाख रुपयांची फसवणूक करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मनोज तुपेसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
मागील महिन्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी मनोज तुपे यांच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मी मोठा उद्योगपती आहे, तुला आणि तुझ्या मैत्रीणीला कामाला लावतो असं सांगून आरोपीने वेळोवेळी विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याची फिर्याद देण्यात आली होती. त्यानुसार हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण ताजे असतानाच मनोज तुपे यांच्यासह चौघांवर मंगळवेढा पोलिस ठाण्यात फसवणूक व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत डेअरी व्यावसायिक बंडू सुखदेव लेंडवे (रा. आंधळगाव, मंगळवेढा) यांनी फिर्याद दिली आहे. लेंडवे यांचं आंधळगाव येथे पांडुरंग दूध संकलन केंद्र असून त्या माध्यमातून ते दूध व्यवसाय करत आहेत. २०१९ साली लेंडवे यांना बाबुराव नकाते यांनी मनोज तुपे यांच्या मालकीच्या रियल डेअरी आणि फॉर्च्युन डेअरीला दूध पुरवठा करण्याबाबत सांगितलं. त्यानुसार त्यांनी आपल्याकडील दूध तुपे यांच्या डेयरीला देण्यास सुरुवात केली. प्रत्येक दिवसाला १० ते १२ हजार लीटर दूधाचा पुरवठा ते करत होते.
या दरम्यान, तुपे यांनी लेंडवे यांना अनुदान मिळवण्यासाठी नवीन खाते सुरू करण्यास सांगितलं. त्यानुसार लेंडवे यांनी चालू खाते सुरू करून त्याचं बिल तुपे यांच्याकडे पाठवलं. मात्र या खात्यात कोणतीही रक्कम जमा झाली नाही. तब्बल ५१ लाख ५१ हजार रुपये थकल्यामुळे लेंडवे यांनी पैशांसाठी तुपेंकडे तगादा लावला. मात्र तुपे यांनी या शेतकऱ्यालाच धमकावले. तू आता पैशांसाठी बारामतीत आला तर तुझ्यावर गुन्हा दाखल करून तुरुंगात पाठवतो. नाहीतर तुला खलास करून टाकतो अशी धमकी दिली.
तुपे यांच्याकडून मिळणाऱ्या धमक्यांमुळे लेंडवे यांनी बारामतीत येणं बंद केलं. दरम्यानच्या काळात जुलै २०२२ मध्ये तुपे यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात रियल डेअरीच्या काटा कर्मचाऱ्याबरोबर संगनमत करून दूधाचे वजन वाढवून घेतल्याचा गुन्हा लेंडवे यांच्यावर दाखल केला. त्यानंतरही तुपे यांच्याकडून पैसे मिळण्याची लक्षणं दिसत नव्हती. त्यामुळं लेंडवे यांनी सतत पैशांची मागणी सुरूच ठेवली. त्यावेळीही मनोज तुपेंनी तुझ्यावर पुन्हा गुन्हा दाखल करतो, तुला जीवे मारतो अशी धमकी दिली.
सततच्या धमक्या आणि पैसे बुडवण्याची मानसिकता यामुळे लेंडवे यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रियल डेअरीचे प्रमुख मनोज कुंडलीक तुपे, दूध संकलन अधिकारी प्रवीण शिवाजी तावरे, बाबुराव नकाते, सुशांत ज्ञानदेव शिर्के या चौघांवर भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ४२०, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोज तुपे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे मनोज तुपे यांच्या अडचणीत आता पुन्हा वाढ झाली आहे.





