BIG BREAKING : वरिष्ठांचा जाच, मुलीचा वाढदिवसही साजरा करता आला नाही; यवत पोलिस ठाण्यातील कर्मचारी स्वत:च्या मृत्यूचा स्टेटस टाकत बेपत्ता

यवत : न्यूज कट्टा  

वरिष्ठांकडून होणारा जाच, कुटुंबाकडे होणारं दुर्लक्ष आणि मुलीचा वाढदिवस साजरा न करता आल्याचं स्टेटस टाकत यवत पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत मुलीच्या वाढदिवशीच स्टेटस टाकत हा कर्मचारी बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

यवत पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या केडगाव पोलिस चौकीत कार्यरत असणारे पोलिस कर्मचारी निखिल रणदिवे हे आज दुपारपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या मुलीचा आज पहिलाच वाढदिवस असून आजच्याच दिवशी त्यांनी वरिष्ठांच्या जाचामुळे आपल्याला मुलीचा वाढदिवस साजरा न करता आल्याचं, तसेच आजारी असताना दवाखान्यात नेता न आल्याचं स्टेटस ठेवलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वत:चा फोटो स्टेटसला ठेवून केलेल्या कामाची योग्य पोच पावती आहे, भावपूर्ण श्रद्धांजली असंही नमूद केलं आहे.

निखिल रणदिवे यांनी यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एका वर्षापासून पोलिस निरीक्षक देशमुख हे आपल्याला त्रास देत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. पोलिस म्हणून कार्यरत असताना सतत बाहेरगावी कर्तव्यासाठी पाठवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आज आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस असतानाही तो साजरा करता येत नसल्याची खंत व्यक्त करून आपण आपल्या जीवाचं बरंवाईट करून घेत असल्याचं त्यांनी या स्टेटसमध्ये नमूद केलं आहे.

दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिस दलात या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. निखिल रणदिवे हे दुपारपासून बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबीय चिंतेत आहे. त्यांच्या सहकाऱ्यांकडून तसेच यवत पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात असून आता या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काय भूमिका घेतली जाते याकडे लक्ष लागले आहे.

 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!