केदारनाथ : न्यूज कट्टा
केदारनाथ धामकडे निघालेल्या एका हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पायलटसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जयस्वाल कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन वर्षांच्या चिरमुरडीचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खराब हवामानामुळे गौरीकुंडच्या जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानं ही दुर्घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गौरीकुंड आणि त्रिजुनीनारायणदरम्यान ही घटना घडली आहे. आर्यन कंपनीचे हे हेलिकॉप्टर सहा प्रवाशी आणि एका पायलटसह केदारनाथच्या दिशेने निघाले होते. खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टर भरकटले. त्यामुळे गौरीकुंड येथील जंगलाजवळ हे हेलीकॉप्टर कोसळले. यामध्ये हेलीकॉप्टरमधील सातही जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जयस्वाल कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. यामध्ये राजकुमार जयस्वाल (वय ४२), श्रद्धा जयस्वाल (वय ३४) आणि त्यांची मुलगी काशी (वय २ वर्षे) या यवतमाळ येथील कुटुंबासह पायलट राजवीर, विक्रमसिंह रावत, तुष्टी सिंह, विनोद नेगी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अहमदाबाद येथे विमान कोसळून २५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला आठवडाही उलटला नाही, तोच केदारनाथमध्ये हा अपघात झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, जयस्वाल कुटुंबीयाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे यवतमाळ जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. जयस्वाल दांपत्याबरोबरच त्यांच्या दोन वर्षांच्या चिमूरडीलाही प्राण गमवावे लागले आहेत. कुटुंबासह धार्मिक यात्रेवर गेलेल्या या कुटुंबाच्या अपघाती मृत्यूनंतर जयस्वाल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.





